महाराष्ट्र कृषिदिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१ जुलै

डॉ. बिधनचंद्र रॉय- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर- मराठी कवी
पंडित हरिप्रसाद चौरसिया- पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात बासरीवादक
चिंतामण मोरेश्वर तथा राजाभाऊ नातू- मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार, नाट्य चळवळ कार्यकर्ते
डॉ. श्रीपाल सबनीस- लेखक
नंदू होनप- ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक
राजन कुलकर्णी- ज्येष्ठ सरोदवादक
गिरीश भालचंद्र पंचवाडकर- मराठी सुगम संगीत गायक
सुदेश भोसले- ज्येष्ठ मिमिक्री आर्टिस्ट, गायक
गोविंद चव्हाण- प्रसिद्ध नाट्य निर्माते
……………………………………
आज भारतीय डॉक्टर दिन आहे.
आज सनदी लेखापाल दिन आहे.
आज महाराष्ट्र कृषि दिन आहे.
……………………………………
डॉ. बिधनचंद्र रॉय- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार (जन्म : १ जुलै १८८२; मृत्यू : १ जुलै, १९६२)
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. आधुनिक पश्चिम बंगालचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय कीर्तींचे निष्णात डॉक्टर व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते. डॉ. बिधनचंद्र रॉय त्यांचा जन्म पाटणा येथे सुविद्य कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाटण्यात होऊन नंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून एल.एम.एस. (१९०६) व एम.डी. (१९०८) या वैद्यकातील उच्च पदव्या मिळविल्या आणि इंग्लंडमध्ये राहून एल.आर.सी.पी. (१९०९) व एफ.आर.सी.एस. (१९११) या उच्च पदव्या संपादन केल्या.
भारतात परतल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांची साहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून कलकत्त्यातील कॅम्बेल वैद्यक महाविद्यालयात नियुक्ती केली पण तेथील यूरोपीयांच्या उद्धट वर्तनामुळे त्यांनी ती सोडून कामिकल वैद्यक महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी धरली. १९२३ मध्ये देशबंधू दासांच्या स्वराज्य पक्षातर्फे ते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा पराभव करून बंगालच्या कायदेमंडळावर निवडून आले. चित्तरंजन दासांच्या मृत्यूनंतर ते त्या पक्षाचे उपनेते झाले. सक्रिय राजकारणातून ते आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडले आणि त्यांनी रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांनी रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसन अँड हायजीन (१९३६) अमेरिकन सोसायटी ऑफ चेस्ट फिजिशियन्स (१९४०) इत्यादींची छात्रवृत्ती मिळविली.
अमेरिका-यूरोपचे दौर केले. पुढे इंडियन मेडिकल कौन्सिलचे ते अध्यक्षही झाले १९४२ ते १९४४ या काळात ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगूरू होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना संयुक्त प्रांताचे राज्यपालपद देऊ करण्यात आले, पण ते त्यांनी नाकारले. तेव्हा त्यांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री करण्यात आले. १९५२, १९५७ व १९६२ अशा तिन्ही सार्वत्रिक निवडणुकांत ते निवडून आले. या पदावर ते अखेरपर्यंत होते.
त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत प. बंगाल राज्यात अनेक मौलिक सुधारणा केल्याः विस्थापित निर्वासितांचा प्रश्न, अन्नधान्य तुटवडा, दुष्काळ, बेकारी इ. महत्त्वाच्या प्रश्नांत लक्ष घालून विधायक योजना कार्यान्वित केल्या व राबविल्या आणि जमीनदारी नष्ट करून जमिनीची कमाल मर्यादा निश्चित केली आणि जलसिंचन योजना, उर्वरके, बी-बियाणे इ. कृषीविषयक बाबींत सुधारणा केल्या. उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले. राष्ट्राची व गोरगरीब रुग्णांची सेवा हा त्यांचा कायमचा ध्यास होता. त्यांनी आपली संपत्ती व राहते घर वैद्यकीय न्यायास अर्पण केले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले तसेच कलकत्ता आदी विद्यापीठांनी सन्मान डी. लिट. पदवी दिली. भारत सरकारने त्यांच्या सेवेचा बहुमान भारतरत्न (१९६१) हा सर्वोच्च पुरस्कार देऊन केला.
……………………………………
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर- मराठी कवी (जन्मः १ जुलै १८८७; निधनः २२ नोव्हेंबर १९२०)
कोल्हापूरजवळच्या रेंदाळ या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. या गावाचे कुलकर्णीपण रेंदाळकरांच्या वाडवडिलांकडे होते. सुरुवातीच्या काळातील रेंदाळकरांच्या कवितांवर रेंदाळकर या आडनावाऐवजी कुलकर्णी असे आडनाव आढळते, त्याचे कारण हेच होय.
बालपण: रेंदाळकरांचे बालपण रेंदाळ आणि कुरुंदवाड येथे गेले. रेंदाळ येथे केवळ प्राथमिक शिक्षणापर्यंतचीच सोय त्या काळी असल्याने चौथीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी रेंदाळकर कागलला गेले. कागल येथे रेंदाळकरांचे वास्तव्य असतानाच्याच काळात त्यांचे वडील वारले. पंधराव्या-सोळाव्या वर्षी झालेला हा आघात रेंदाळकरांना सोसणे फार जड गेले. नोकरी १९०५ मध्ये रेंदाळकरांनी बेळगाव जिल्ह्यातील कुन्नूर (चिक्कोडी तालुका) या गावी शिक्षकाची नोकरी केली. रेंदाळकरांना वाचनाचा दांडगा छंद होता. कुन्नूरसारख्या खेड्यात तो भागेना व एकंदरीतच तेथील नीरस जीवनालाही ते कंटाळून गेले व त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
संस्कृतचा अभ्यास: रेंदाळकरांना उत्तम कविता करायची फार इच्छा होती, परंतु अक्षरगण वृत्तांत कविता लिहायची तर संस्कृत भाषेत प्रावीण्य हवे, असे त्यांच्या मनाने घेतले व संस्कृत शिकण्याचा निश्चय करून ते सांगलीत आले. तेथे ते संस्कृत पाठशाळेत जाऊ लागले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातील विख्यात संस्कृतज्ञ बाळशास्त्री हुपरीकर हे त्यांचे आप्त होते. ‘सिद्धान्त कौमुदी’चे अध्ययन करण्याचीही रेंदाळकरांची इच्छा होती. ती त्यानी हुपरीकरांना कळविली व होकार येताच, १९०९ च्या सुमारास सांगलीतील मुक्काम हलवून रेंदाळकर कोल्हापूरला आले. तेथे त्यांनी दोन वर्षे सिद्धान्त कौमुदीचे अध्ययन केले.
कवितालेखन: कोल्हापूरच्या मुक्कामात रेंदाळकरांमधील कवित्व बाळशास्त्री हुपरीकरांच्या ध्यानी आले. त्यांनी रेंदाळकरांना प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात त्या काळी ‘विजयी मराठा’ हे साप्ताहिक निघत असे. याच साप्ताहिकात रेंदाळकरांच्या सुरवातीच्या काळातील कविता प्रसिद्ध झाल्या. मात्र, ‘मंदार’ या टोपणनावाने त्या प्रसिद्ध होत असत.
रेंदाळकरांना बंगाली भा़षा उतम येत होती. त्यांनी तरुलता मुझुमदार, मधुसूदन मायकेल दत्त या बंगाली कवींच्या कवितांचे मराठी रूपांतर केले आहे. बंगालीबरोबरच काही संस्कृत, इंग्रजी व क्वचित गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या. पहिली कविता: इ.स. १९०८ साली ‘वरिवरी जळे बाळे! डोळे अहा भरले किती!’ ही रेंदाळकरांची अगदी पहिली कविता ‘केरळ कोकिळा’मध्य़े प्रसिद्ध झाली. या मासिकाचे विख्यात संपादक कृष्णाजी नारायण आठवले हे चोखंदळ व चिकित्सक म्हणूनच प्रसिद्ध होते. रेंदाळकरांच्या काव्यगुणांची आठवले यांनी त्यांच्या कवितेखालीच मनमोकळी स्तुती केली होती.
कवितासंग्रह: पुढे कोल्हापुरातील जगद्गुरू मठातर्फे ‘धर्मविचार’ हे मासिक सुरू झाले. रेंदाळकर त्याचे सहसंपादक झाले. हे काम एकीकडे सुरू असताना त्यारेंदाळकरांचे कवितालेखनही जोमात होते. याच काळात ‘मंदारमञ्जरी’ या शीर्षकाने १९१० रोजी रेंदाळकरांनी निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. ‘सुधारक’, ‘विविधज्ञानविस्तार’, ‘मनोरंजन’, ‘प्रगती’ इत्यादी त्या वेळच्या नियतकालिकांत या पुस्तकाची प्रशंसापर परीक्षणे प्रसिद्ध झाली. ‘मंदारमञ्जरी’मुळे महाराष्ट्रातील मान्यवर कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
रेंदाळकरांचे सांगलीतील वास्तव्य वामन जनार्दन कुंटे यांच्या वाड्यात होते. पुढे कुंटे त्यांचे गाढ स्नेही झाले. रेंदाळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचे दोन खंड कुंटे यांनी प्रसिद्ध केले. कुंटे यांच्यामुळेच रेंदाळकरांच्या कविता महाराष्ट्रापुढे आल्या. या कविता रेंदाळकरांची कविता’ (दोन भाग, १९२४; १९२८) ह्या नावाने संकलित करण्यात आल्या आहेत. रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ या काव्याचे ‘सारजा’ ह्या नावाने मराठीत रूपांतर केले.
रेंदाळकरांचे प्रकाशित काव्यसंग्रह: अन्योक्तिमुक्तांजंलि (दोन भाग, १९११; १९१५), मंदारमंजरी (१९१०), बुद्धिनीति (१९१६), मोहिनी (खंडकाव्य, १९१३), यमुनागीत (दीर्घकाव्य) विरहिणी राधा (१९१६), सारजा (दीर्घकाव्य)
संपादकीय कारकीर्द: रेंदाळकर सहसंपादक असलेल्या ‘धर्मविचार’चे प्रकाशन १९१२ मध्ये एका वर्षापुरते स्थगित झाले. त्यानंतर रेंदाळकर मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘मासिक मनोरंजन’मध्ये साहाय्यक संपादक म्हणूम रुजू झाले. तेथे आधीच पदावर असलेल्या विठ्ठल सीताराम ऊर्फ वि.सी. गुर्जर यांच्याबरोबरच ‘मनोरंजन’वर रेंदाळकरांचेही नाव झळकू लागले. गुर्जर यांचे ते साहाय्यक होते.’मनोरंजन’शिवाय ‘करमणूक’, विविधज्ञानविस्तार’ येथेही निरनिराळ्या काळी रेंदाळकर संपादक म्हणून काम करत होते.
कौटुंबिक माहिती: रेंदाळकरांचे लग्न वयाच्या तेविसाव्या-चोविसाव्या वर्षी झाले. रेंदाळकरांच्या पत्नींना पुढे हिस्टेरिया जडला. १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाले. रेंदाळकर पती-पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा होता.
रेंदाळकरांच्या प्रसिद्ध कवितासंपादन करा
१. अजुनी चालतोचि वाट. ही कविता बालभारती या शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकात आहे.< br/> २. हे कानामागुनी आले | शाहणे फारची झाले | उघडितों तयांचे डोळे ||…संग्रामगीते (रेंदाळकरांची कविता -खंड ३)
शेवाळकर यांच्या ब्लॉगस्पॉटवरून.
……………………………………
पंडित हरिप्रसाद चौरसिया- पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात बासरीवादक यांचा आज वाढदिवस (जन्म : १ जुलै १९३८)
चौरसियांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही कुस्तीतच नावलौकिक मिळवावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळत संगीताचा अभ्यास आरंभला. मित्राच्या घरी संगीतशिक्षणाचा सराव करणारे हरिप्रसाद काही काळ तालमीसाठी वडिलांसोबत आखाड्यात जात राहिले. बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणार्‍या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात.
वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळ राहणार्‍या पंडित राजारामांकडून हिंदुस्तानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी वाराणसीच्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीचे स्वर ऐकणा-याला मंत्रमुग्ध करतात. अशा या प्रख्यात बासरीवादकाचा संगीत प्रवास उलगडणा-या‘बासरी गुरू’ या लघुपटाची निर्मिती भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या फिल्म डिव्हिजनने केली आहे.
‘बासरी गुरू’मधून पंडितजींच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना पाहाता येतील. लघुपटाची सुरुवात होते, पंडितजींच्या बालपणापासून. १९३८ ते १९४८ असा दहा वर्षाचा काळ त्यात दाखवला आहे. चौरसियांचं १९५८ पर्यंतचं कुमार वयातील काळही यात पाहायला मिळेल. १९५८ ते १९६१ या काळात पंडितजींनी ऑल इंडिया रेडिओवर संगीतकार म्हणून काम केलं. १९६८ पर्यंत त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी शास्त्रीय संगीतावर लक्ष केंद्रीत केलं.
त्यांनी गुरूसाठीही शोध सुरू केला. १९७० च्या दशकात पं. चौरसिया हे जागतिक स्तरावरील एक सर्वात लोकप्रिय कलाकार ठरले. त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला तो आजतागायत. आजही ते खूपच व्यग्र आहेत. आपल्या ‘वृंदावन गुरुकुल’च्या माध्यमातून आपला वारसा नवीन पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अतुलनीय संगीतकार होण्यासाठी पंडितजींनी जे कष्ट उपसले त्याचीही कथा लघुपटात मांडण्यात आली आहे. ध्येयपूर्तीसाठी सर्व संकटांवर मात करत पंडितजींनी केलेला प्रवासही यात पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारच्या घराण्याचा वारसा नसतानाही बासरीवादनात पंडितजींनी मिळवलेलं यश, तसंच पहेलवान ते पंडित हा प्रवास या उलगडण्याचा प्रयत्न लघुपटाचे दिग्दर्शक राजीव चौरसिया यांनी केला आहे.
सांगलीला आमच्या अ ब क ड कल्चरल ग्रुपच्या संगीत महोत्सवामध्ये त्यांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम केला होता,त्यांना महिला तबला वादक अनुराधा पाल यांनी सुरेख साथ केली होती. प्रचंड प्रतिसादामध्ये सांगलीकर रसिक श्रोत्यांनी त्याचा आनंद घेतला होता.
त्या नंतर त्यांची परंपरा पुढे चालवणऱ्या त्याचे पुतणे राकेश चौरासिया यांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम देखील आम्ही केला होता पंडितजींना मिळालेले पुरस्कार: संगीत नाटक अकादमी पुरस्कार – १९८४ कोणार्क सम्मान – १९९२ पद्मभूषण – १९९२ यश भारती सन्मान – १९९४ पद्मविभूषण – २००० हाफिज अली खान सन्मान – २००० दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – २००० पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी वाजवलेल्या पहाडी धून ची लिंक
https://youtu.be/KAYx7ssM6FI (प्रसाद जोग, सांगली. ९४२२०४११५०)
……………………………………
चिंतामण मोरेश्वर तथा राजाभाऊ नातू- मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार व पुण्यातील नाट्यचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते यांचा आज स्मृतिदिन (जन्म: अज्ञात; निधनः १ जुलै १९९४)
महाराष्ट्रीय कलोपासक या नाट्यसंस्थेमार्फत १९६३ सालापासून आयोजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेच्या घडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
राजाभाऊ नातू म्हणजे ‘कलोपासक’चे चिटणीस आणि पुरुषोत्तम स्पर्धेचे सर्वेसर्वा. एक उत्तम दिग्दर्शक आणि नेपथ्यकार असा त्यांचा लौकिक होता. पुरुषोत्तम करंडक’ ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेणा-या ‘महाराष्ट्र कलोपासक’ या संस्थेची स्थापना पुण्याच्या नाटकवेडया मित्रांनी ८० वर्षापूर्वी केली. या स्थापनेत आघाडीवर होते पुरुषोत्तम रामचंद्र ऊर्फ आप्पासाहेब वझे, भगवान पंडित व प्रभुदास भूपटकर. ही स्पर्धा आकारास येत असतानाच १९६२ साली आप्पासाहेब वझे यांचे निधन झाले. त्यांच्या प्रति असलेली कृतज्ञतेची भावना स्मरणात राहावी म्हणून संस्थेचे तत्कालीन चिटणीस, राजाभाऊ नातू यांनी कै. पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ आप्पासाहेब वझे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’ आयोजित केली जावी, ही कल्पना मांडली. त्या कल्पनेला आकार आला आणि गेले ५५ वर्ष पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या मनात आपली हक्काची प्रतिष्ठा कमावली. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
डॉ. श्रीपाल सबनीस- लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष यांचा आज वाढदिवस (जन्म : १ जुलै १९५०)
पिंपरी-चिंचवड मध्ये भरलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित झालेल्या डॉ. श्रीपाल सबनीस हे मूळचे मराठवाड्यातल्या एका जमीनदार कुटुंबातले.
डॉ. सबनीस यांचे गाव लातूर जिल्ह्यातील हाडोळी. निलंगा तालुक्यातील हे गाव हैदराबाद मुक्तिसंग्रामात गाजलेले आहे. श्रीपाल सबनीस यांचे वडील मोहन सबनीस यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सहभाग नोंदवला होता. जमीनदार कुटुंबातील निजामांविरुद्ध त्यांनी स्वतंत्र ‌लढा उभारला होता. डॉ. सबनीस आयुष्यात वेगवेगळ्या चळवळींचा आणि कलाविष्कारांचा अनुभव घेतलेले लेखक आहेत. दादा कोंडकेंच्या ‘विच्छा माझी…’ने प्रभावित होऊन ‘शुक्राची तू चांदणी’सारखे वगनाट्य त्यांनी लिहिले आहे. राजकारणावर आधारित ‘सत्यकथा ८२’ किंवा ‘क्रांती’ सारख्या राज्यस्तरीय पारितोषिकविजेत्या एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत. आदिवासी पाड्यावर जाऊन डफावर थाप देत शाहिरीही त्यांनी केली आहे. पुढे त्यांनी समीक्षेची वाट चोखाळली. डॉ. सबनीस यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. २६ पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या अनेक एकांकिका गाजलेल्या आहेत. ६० हून अधिक लेखक आणि कवींच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे. ग्रामीण, दलित, संत व स्त्री-साहित्य यांवरही त्यांनी प्रगल्भतेने लिखाण केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुरस्कार त्यांना मिळाला आहे. महात्मा फुले, डी. डी. कोसंबी, न. चिं. केळकर, स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर, प्रबोधनकार ठाकरे, जाणिवा आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. याशिवाय पुणे येथे झालेल्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे ते उद‍‍्घाटक होते. बडोदा ये‌थे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. दुसऱ्या विदर्भ साहित्य संस्कृती संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
नंदू होनप- ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक (जन्म : १ जुलै १९५३; निधनः १८ सप्टेंबर २०१६)
नंदू होनप यांचे वडील विष्णू दिनकर होनप हे संगीत शिक्षक होते. त्यांनी नंदू होनप यांना व्हायोलिन शिकण्याचा सल्ला दिला. एवढेच नाही तर हे वाद्य अर्थात व्हायोलिन तुला जग दाखवील, असा आशीर्वादही दिला. गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रवींद्र साठे, अजित कडकडे, कविता कृष्णमूर्ती, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, नेहा राजपाल, स्वप्नील बांदोडकर अशा कित्येक गायकांबरोबर त्यांनी काम केले.
शिर्डी माझे पंढरपूर, नमन श्री एकदंता, शांताई मंगेशी, गजानन शेगावी आले, स्वामी समर्थ कथामृत्त असे अनेक भक्तिमय अल्बम त्यांनी केले. भक्तिगीते आणि भावगीते असा प्रवास करीत असतानाच त्यांनी जवळपास ९४ हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यातील काही चित्रपटांना पार्श्वीसंगीत त्यांचा मुलगा स्वरूपने दिले आहे. सह्याद्री वाहिनीवरील “प्रणाम पप्पा सलाम पप्पा‘ या कार्यक्रमाचे शीर्षक गीत त्यांनी तसेच त्यांच्या मुलाने कंपोझ केले होते. मच्छिंद्र कांबळी यांच्या “भैया हात पाय पसरी‘ या नाटकाला त्यांनीच संगीत दिले होते. जवळपास आठशेहून अधिक त्यांचे अल्बम्स आले. भक्तिगीते, भावगीते, लावणी, भारूड, स्तोत्र… संगीतातील विविध प्रकार त्यांनी हाताळले. “दगा बाज रे‘, “सुनो ना संगे मर मर‘, “तेरी मेरी प्रेम कहानी‘, “तेरी गलियॉं‘ या आणि अशी अनेक गाणी त्यांनी व्हायोलिनवर वाजविली आहेत. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संगीतकार म्हणून “सारेच सज्जन‘ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आणि “विश्वा्स‘ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट होता.
नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तीमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दत्तावरील अनेक गाण्यांना संगीत दिलेले. गायक अजित कडकडे यांनी गायलेले निघालो घेऊन दत्ताची पालखी.. हे गाणे होनप यांनीच संगीतबद्ध केले होते. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी केली होती. निघालो घेऊन दत्ताची पालखी”, “अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली”, “स्वामी कृपा कधी करणार” आणि अशी हजारो स्वामी भक्तीपर गीते संगीतबद्द केली होती. ते भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले होते. कॅसेटच्या जमान्यात नंदू होनप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकापेक्षा एक अभंग, भजनांचा सांगितिक नजराणाच संगीत रसिकांना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी सर्वाधिक भक्तीगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. लावणी, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीतं, प्रेमगीतं आदींनाही त्यांनी संगीत दिले.
नंदू होनप यांच्या व्हायोलिननं बॉलिवूडवरही गारुड केलं होतं. बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या गीतांना त्यांनी व्हायोलिन साथ केली होती. दगाबाज रे… सावन आया है… सुनो ना संगे मरमर… सुन रहा है… या गाण्यांचा त्यात समावेश आहे. नंदू होनप यांचे कार्यक्रम करताना निधन झाले. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
राजन कुलकर्णी- ज्येष्ठ सरोदवादक, यांचा आज वाढदिवस. (जन्म: १ जुलै १९६०)
आज भारतातील अग्रगण्य सरोद वादकांच्या पैकी सुरमणी पंडित राजन कुलकर्णी यांना घरातूनच संगीताचा वारसा मिळाला. संगीताशी संबंधित असलेल्या कुटुंबात जन्मलेले पंडित राजन कुलकर्णी यांचे वडील पंडित विनायकराव कुलकर्णी आणि त्यांचे काका पंडित रघुनाथराव कुलकर्णी यांनी त्यांना एकाच वेळी स्वर संगीत आणि तबला वादन शिकवण्यास आरंभ केला. योगायोग म्हणजे, काका पंडित रघुनाथराव कुलकर्णी हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पहिल्या पहिल्या शिष्यांमध्ये होते. त्यांनी लाहोरात संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासंबंधी योगदान दिले होते. फाळणीनंतर ते अमृतसरला स्थिरावले. पंडित विष्णू दिगंबर यांच्या म्हणण्यानुसारच पंडित रघुनाथराव कुलकर्णी यांनी १९३७ मध्ये पंजाबच्या अमृतसर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. पंडित राजन कुलकर्णी यांचे वडील पंडित विनायकराव कुलकर्णी यांनी परंपरा पुढे चालू ठेवली आणि त्यांचे जीवन कल्पित गायक, गायक आणि वादक यांच्यासाठी व्यतीत केले. पंडित राजन कुलकर्णी यांनी आपल्या वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत गायन आणि तबला शिकणे चालू ठेवले. येथे त्यांनी वेगवेगळ्या रागांचे उत्तम ज्ञान मिळवले पण त्यांना स्वर संगीता पेक्षा वाद्य संगीतात आवड निर्माण झाली. याच सुमारास सरोदच्या आवाजाने तरुण राजन यांच्यावर आपली जादू उमटली आणि त्यांनी सरोदवादक म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी १९७८ मध्ये पंडित रत्नाकर व्यास यांच्याकडे सरोद शिकण्यास सुरुवात केली. पंडित रत्नाकर व्यास यांनी त्यांच्याकडून सरोद-वाजवण्याच्या च्या शैली आणि राग व लया यांच्या शुद्धतेबद्दलही विशेष लक्ष दिले. तसेच त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अनेक दिग्गजांकडून मार्गदर्शक सूचना व उपयुक्त सूचना मिळवण्याबरोबरच पंडित राजन कुलकर्णी यांना प्रख्यात गायक आणि शिक्षक दिवंगत पंडित नारायणराव व्यास यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. पंडित राजन कुलकर्णी १९९३ पर्यंत अमृतसर मध्ये होते. हे पुण्यात शिफ्ट झाल्यावर पंडित राजन कुलकर्णी यांनी पुण्यात संगीतासाठी वाहिलेली संस्था ‘सारंग संगीत विद्यालयाची’ स्थापना केली. आज हे विद्यालय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या तीनही विद्याशाखांमध्ये (गायन, वाद्य व नृत्य) संगीताचे प्रशिक्षण देते. पंडित राजन कुलकर्णी हे सर्व विद्यार्थ्यांना रियाजची सवय लावताना दिसतात. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय विद्यालय, मुंबई यांनीही शाळेला मान्यता दिली आहे. दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर १९३७ मध्ये अमृतसरमध्ये सुरू झालेली अध्यापनाची परंपरा पुण्यात अखंडपणे सुरू आहे. पंडित राजन कुलकर्णी यांनी संगीत मैफलीचे आयोजन आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ‘स्वरसंगम फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. या स्वरसंगम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संगीत मैफिली आयोजित करण्याचा प्रयत्न करतो. गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देखील दिली जाते. याशिवाय फाउंडेशनतर्फे दुर्गम भागात राहणाऱ्या आणि नियमितपणे पुण्यात ये-जा न करणा ऱ्याना वाद्य सल्ला व समुपदेशन देण्यात येते, सारंग संगीत विद्यालयाने केलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे भारतातील तसेच इटली, फ्रान्स आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये दूरवर राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पंडित राजन कुलकर्णी distance learning द्वारे शिक्षण देतात. १९७९ मध्ये जालंधर येथील हरिल्लभ संगीत संमेलनात प्रख्यात सतार वादक पंडित रविशंकर कडून पंडित राजन कुलकर्णी यांना सुवर्णपदक मिळाले होते. तसेच मुंबईच्या सुरसिंगार संसदेने त्यांना “सूरमणी” ही पदवी दिली आहे. राजन कुलकर्णी यांनी देशा विदेशात अनेक मैफिली केल्या आहेत. राजन कुलकर्णी यांचे चिरंजीव श्रीरंग कुलकर्णी हे ही प्रसिद्ध सरोदवादक आहेत. श्रीरंग कुलकर्णी यांनी आपल्या वडिलांच्याकडे सरोदच्या शिक्षणा बरोबरच गांधर्व महाविद्यालयात सरोद वादनाचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी सरोद व इलेक्ट्रॉनिक गिटारचे फ्युजन केले आहे. त्यासंबंधी वाद्य निर्माण केले आहे. झीरॉड असे नामकरण तौफीक कुरेशी यांनी या वाद्यासंबंधी केले आहे. फ्युजन म्हणजेच शास्त्रीय संगीतातला पुढला भाग किंवा आवृत्ती. युवकांना फ्युजन अधिक आवडते. त्याचा प्रसार करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. राजन कुलकर्णी यांचे संकेत स्थळ. http://www.rajansarod.com (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
गिरीश भालचंद्र पंचवाडकर- प्रख्यात मराठी सुगम संगीत गायक यांचा आज वाढदिवस. (जन्म : १ जुलै १९६०)
गिरीश पंचवाडकर यांच्या घराण्यातच संगीत आहे. त्यांचे आजोबा पंढरपुरातील प्रसिद्ध कीर्तनकार होते. लहानपणापासून गिरीश यांना गाण्याची आवड होती. त्यांचे गायनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांचे वडील आणि गुरु भालचंद्र हरिभाऊ पंचवाडकर यांच्याकडे झाले. जुन्या पिढीतील ज्येष्ठ संगीततज्ञ आणि नॉर्थकोट हायस्कूल व हरिभाई देवकरण प्रशालेचे एक तळमळीचे संगीत शिक्षक म्हणून पंचवाडकर सरांचा लौकिक होता. गिरीश यांचे अक्षर
अतिशय सुंदर आहे आणि तितकेच सुंदर गायन यांसाठी ते प्रसिद्ध आहेत.गिरीश हे बँकेची नोकरी सांभाळून १९९२ पासून गायनाचे कार्यक्रम करीत आले आहेत. ‘पहाटगाणी’, ‘अक्षयगाणी’ ‘एक धागा सुखाचा’ ‘गीत रामायण’ ‘तो राजहंस एक’ आणि ‘शब्दस्वरांचे इंद्रधनुष्य’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. सोलापूर मध्ये “दिवाळी पहाट” ची सुरुवात त्यांनी केली.
आकाशवाणी सोलापूर येथे त्यांचे गायनाचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांच्या “क्षितिज” या संस्थेतर्फे ते सुगम संगीताचे कार्यक्रम करतात. २००९ मध्ये “राष्ट्रपती भवन, दिल्ली” येथे मराठी गायन मैफल करायची संधी त्यांना मिळाली.
गिरीश पंचवाडकर यांना महाराष्ट्र शासनाचा – गुणवान कामगार पुरस्कार, महाराष्ट्र गुणीजन रत्न कलागौरव, महापौर गौरव असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे चिरंजीव अक्षय पंचवाडकर हे उत्तम तबला वादक असून डॉ.आदिती ही कन्या उत्तम गायिका आहेत. मा.प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती असताना राष्ट्रपती भवनामध्ये गिरीश व अक्षय पंचवाडकर या पितापुत्रांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. गायिका शीतल पंडित आणि अक्षय पंचवाडकर या दोघांनी मिळून “नादसप्तक अकादमीची” स्थापना केली आहे. त्या माध्यमातून भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत, लावणी, अभंग, गज़ल, लोकगीत, सुगम संगीत असे संगीताचे विविध प्रकार शिकवले जातात. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
सुदेश भोसले- ज्येष्ठ मिमिक्री आर्टिस्ट, गायक यांचा आज वाढदिवस. (जन्म : १ जुलै १९६१)
आज विविध कॉन्सर्टांमधून, परदेश दौऱ्यातून परफॉर्मन्स देणारे सुदेश भोसले हे ‘दुर्गाबाई शिरोडकरांचे’ नातू आहेत हे कळल्यावर गायन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे आदराने कानाची ‘पाळी’ पकडतात ते पाहून सुदेश गहिवरतात. लतादीदी, आशाताई, पं. हृदयनाथ, गुलाम मुस्तफा खान यांसारख्या दिग्गजांनी आपल्या आजीविषयी काढलेले भावोद्गार ऐकून ते हेलावतात. सुदेश भोसले यांच्या आजी दुर्गाबाई शिरोडकर या त्यांच्या पिढीतल्या नामवंत शास्त्रीय गायिका होत्या. पण त्या असेपर्यंत सुदेश यांना त्यांच्याकडून कधीच गाणे शिकायला मिळालं नाही, कारण तेव्हा त्यांच्या मनात गाणे असे कधी आलेच नव्हते. सुदेश भोसले यांची आई सुमन भोसले यासुद्धा उत्तम गायिका होत्या आणि दुर्गाबाईंच्या तालमीत तयार झालेल्या होत्या. दोघी आकाशवाणीवर ‘ए’ ग्रेड गायिका म्हणून नावाजलेल्या होत्या. आई एवढी उत्तम गायिका असूनही तिने सुदेशना समोर बसवून गाणे शिकवले नाही. वडील चित्रकार नरेंद्र भोसले यांचा चित्रपटांची मोठमोठी होर्डिंग्ज रंगवण्याचा व्यवसाय होता. सुदेश यांना कॉलेजपासूनच पोट्रेट्स काढायचा छंद जडला होता. त्यामुळे ते वडिलांना पोस्टर रंगवण्यात मदत करत. ‘जूली’, ‘प्रेमनगर’,’ स्वर्ग नरक’ इत्यादी चित्रपटांची पोस्टर्स सुदेश भोसले यांनीच रंगवली आहेत.
गाणे घरात आणि स्वतःत असूनही, जेव्हा सुदेश ‘मेलडी मेकर्स’ मध्ये गेले तेव्हा त्यांच्या गायनावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर ते शास्त्रीय संगीतावर भर द्यायला लागले. गाणे आणि पेंटिंग हे जवळ असूनही त्याचे शिक्षण ज्या वयात व्हायला हवे होते तेव्हा झाले नाही. अनुभवाने ते हळूहळू गाणे शिकत गेले. सुदेश भोसले यांचे गाणे हे केवळ त्यांच्या छंदातून, आणि गायकांच्या नकला करणे हे कॉलेजमधल्या टाइमपासमधून सुरू झाले. गायन क्षेत्रात ‘करिअर’ करावयाचे ठरल्यानंतर सुदेश यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुदेश भोसले आणि बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांचे अतूट असे नाते आहे. अमिताभ बच्चन यांची ‘मिमिक्री’करता करता सुदेश भोसले यांचा आवाज अमिताभ बच्चन यांचा आवाज झाला. सुदेश भोसले यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी “चुम्मा चुम्मा‘, “शावा शावा‘, “सोना सोना‘, “मेरी मखना‘ ही गाणी गायली आहेत.
आपल्या गायन श्रेष्ठ आजीचा सहवास आपल्याला फार काळ लाभला नसला हे जरी खरे असले तरी त्याची भरपाई सुदेश एका ‘म्युझिक इन्स्टिटय़ूट’च्या उभारणीने करत आहेत. दुर्गाबाईंनी गायलेल्या अप्रतिम बंदिशी आणि विविध राग यांचे मैफलीतून झालेले सादरीकरण ते रेकॉर्ड, कॅसेटच्या माध्यमातून जतन करून ठेवीत आहेत. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि दुर्गाबाईंची गायनस्मृती जपून ठेवण्याच्या उद्देशाने ते गोव्यातील ‘शिरोडा’ येथे दुर्गाबाईंच्या राहत्या घरी ‘कलाघर’ हा उपक्रम साकारत आहेत. दुर्गाबाईं विषयीच्या उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी व दुर्गाबाईंचे नात-जावई शंकर पटनाईक यांनी फिल्म डिव्हिजनसाठी एक लघुचित्रपटही बनविलेला आहे. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)
……………………………………
गोविंद चव्हाण- प्रसिद्ध नाट्य निर्माते (जन्म: १ जुलै १९६७; निधनः १३ जुलै २०२०)
यांचा जन्म हेबाळ ता. गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथे झाला. यू टर्न, हिमालयाची सावली, मदर्स डे, दुधावरची साय यासह अनेक गाजलेल्या नाटकांची निर्मिती त्यांनी केली होती. कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथील लहानशा गावातून गोविंद चव्हाण मुंबईला नशीब अजमवायला आले, पण कलेची आवड अगदी लहानपणापासूनची. गावात मुंबईतील नाटकांचे जे प्रयोग व्हायचे, ते चव्हाण जराही चुकवायचे नाहीत. स्थानिक कलाकारांसोबत छोटय़ा एकांकिका करायचे. त्यात साडय़ांचे पडदे लावण्यापासून पडेल ते काम करायचे. इयत्ता सातवीत असताना त्यांनी कै. विनोद हडप यांच्या बालनाटय़ात काम करून रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत छोटय़ा एकांकिकेचे प्रयोग करून आपली आवड भागवून घेतली. पुढे नोकरी आणि शिक्षणासाठी मोठय़ा भावाकडून १०० रुपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली. डिलाईल रोड येथे ग्रामस्थांच्या खोलीत राहू लागले. चव्हाण नोकरी सांभाळून शाहीर साबळे यांच्या लोककला पथकात तालमीला जायचे. इन्कम टॅक्समध्ये नोकरी लागल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खऱया अर्थाने स्थैर्य आले. मग जमेल तसा वेळ त्यांनी नाटकांची हौस भागवण्यासाठी दिला. नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. विविध स्पर्धांना ते बक्षिसं द्यायला लागले. नाटकांची आर्थिक गणितं, रंगभूमीचे बदलते ट्रेंड, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवरचे प्रयोग या सगळ्यांचा अभ्यास ते काही वर्षे करत होते.
२००० साली त्यांनी मुलगी सुप्रिया हिच्या नावाने सुप्रिया प्रॉडक्शन ही निर्मिती संस्था सुरू केली. २००१ साली ‘पांडुरंग फुलवाले’हे पहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणलं. त्यानंतर ’वन रूम किचन’ आणलं. दुधावरची साय, चॉईस इज युवर्स, जाऊ दे ना भाई, कथा, मदर्स डे, टाईम प्लीज या नाटकांची निर्मिती केली, पण खऱया अर्थाने नाटयक्षेत्रात त्यांचा जम बसला तो आनंद म्हसवेकर लिखित ’यू टर्न’ या नाटकामुळे. फक्त दोन पात्रं आणि फोल्डिंगचा सेट असलेल्या या नाटकाचे सुमारे 650 प्रयोग झाले. अनेक पुरस्कार ’यू टर्न’च्या वाटय़ाला आले. या नाटकाचा हिंदी, गुजराती आणि कन्नड भाषांमध्ये अनुवाद होऊन त्याचे प्रयोग झाले. चव्हाण यांचे ’हिमालयाची सावली’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून अजरामजर झालेले, श्रीराम लागू यांचा अभिनय साज असलेले नाटक रंगभूमीवर आणण्याचे धाडस त्यांनी केले आणि त्यात ते यशस्वी झाले.
गोविंद चव्हाण यांची अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संस्थेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. व्यवसायाबरोबर नवीन कलावंतांचा शोध घेण्यासाठी त्यांनी संस्थेतर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा काही वर्षे घेतल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याच धर्तीवर अनोख्या एकांकिका स्पर्धा घ्याव्यात असे त्यांच्या मनात आले. ‘वस्त्रहरण’फेम गंगाराम गवाणकर यांना सोबत घेऊन बोलीभाषा एकांकिका स्पर्धा सुरू केली. बोलीभाषेतील नाटकांना अजून व्यावासायिक रंगभूमीवर फारसे महत्त्वाचे स्थान नाही. हे स्थान मिळणे गरजेचे आहे. त्यातून बोलीभाषेचा अधिक प्रसार होईल असे चव्हाण यांचे म्हणणे असायचे. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगी सुप्रिया हिने ही स्पर्धा पुढे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच सुप्रिया प्रॉडक्शनचे ‘हिमालयाची सावली’ हे नाटकही सुरू राहणार आहे.
व्यावसायिक नाटय़ निर्माता म्हणून वावरताना चव्हाण यांनी नफातोटय़ाचे गणित कधीच मनात न ठेवता नाटकाचा पैसा नाटकालाच वापरायचा हे धोरण राबवले. त्यातून चांगलं नाटक, चांगला विचार प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या छोटय़ाशा स्वप्नांनी रंगभूमीकडे घेतलेला यू टर्न तमाम नाटय़ रसिकांसाठी अत्यंत सुखद होता, आनंदाची पर्वणी देणारा होता असंच म्हणता येईल. (संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »