माळीनगर साखर कारखान्याच्या नेतृत्वात बदल; मोहन लांडे यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे। शुगरटुडे

येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला असून, कारखान्याच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक मोहन लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर विशाल जाधव यांची व्हाईस चेअरमनपदी आणि निखिल कुदळे यांची होलटाईम डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे कारखान्याला अनुभवी आणि समन्वयवादी नेतृत्व लाभल्याची भावना सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Mohan Lande, Malinagar Sugar
Mohan Lande
Vishal Jadhav Malinagar Sugar
Vishal Jadhav

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यापूर्वीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मोहन लांडे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रक्रियेत संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेतल्यामुळे कारखान्यातील नेतृत्वबदल सुरळीत पार पडला.

मोहन लांडे हे २०१४ पासून संचालक मंडळावर कार्यरत असून कारखान्याच्या विविध प्रशासकीय आणि विकासात्मक निर्णयांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या शांत, अभ्यासू आणि समन्वय साधणाऱ्या नेतृत्वशैलीमुळे ते संचालक मंडळात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर माळी एज्युकेशन सोसायटीच्या पदसिद्ध चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

नवनियुक्त व्हाईस चेअरमन विशाल जाधव हे २०१९ पासून संचालक मंडळावर कार्यरत असून ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने भूमिका मांडत आले आहेत. तर निखिल कुदळे हे देखील २०१९ पासून संचालक म्हणून कार्यरत असून त्यांना आता होलटाईम डायरेक्टरची जबाबदारी देण्यात आली आहे. कारखान्याच्या दैनंदिन कामकाजात त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, माळीनगर साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत गाळप क्षमता वाढ, कार्यक्षम व्यवस्थापन आणि आर्थिक शिस्त यावर भर दिला आहे. नव्या नेतृत्वासमोर उत्पादनवाढ, ऊस उपलब्धता, इथेनॉल प्रकल्पांचा विस्तार, ऊर्जा बचत आणि शेतकरीहिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

संचालक मंडळातील अनेक सदस्यांनी विविध पदांवर काम करत कारखान्याच्या विकासात योगदान दिले आहे. नव्या नेतृत्वामुळे कारखान्याच्या प्रगतीला अधिक गती मिळेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास संचालक, सभासद आणि परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे माळीनगर साखर कारखाना आगामी गळीत हंगामासाठी अधिक सक्षमपणे सज्ज होईल आणि विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »