कृष्णा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार प्रदान

कराड । शुगरटुडे
शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या हंगामातील उल्लेखनीय तांत्रिक कार्यक्षमतेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने कारखान्याला ‘प्रथम पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आज, मंगळवारी आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे, संचालक धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, बाजीराव थोरात, आनंदा खबाले, अरविंद पाटील, सत्यजित पाटील, बाळासो जगताप, अविनाश खरात तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबशेटवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कार्यक्षमता पुरस्कार २०२४-२५ अंतर्गत कारखान्याला हा बहुमान मिळाला आहे. भारत सरकारच्या साखर विभागाच्या मुख्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीने कारखान्याच्या तांत्रिक व उत्पादन क्षमतेचे सखोल मूल्यांकन करून हा निकाल घोषित केला होता. विशेष म्हणजे, २०२४-२५ चा गाळप हंगाम अत्यंत आव्हानात्मक असतानाही कारखान्याने उत्कृष्ट नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत उच्च साखर उतारा व तांत्रिक कार्यक्षमतेत अव्वल स्थान पटकावले. चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली कारखान्याने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या यशस्वी कामगिरीची मोहोर उमटवली आहे.
”कृष्णा कारखान्याने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या जोरावर प्रगती साधली आहे. २०२४-२५ चा गाळप हंगाम सर्वच दृष्टीने आव्हानात्मक होता. मात्र, कारखान्याचे अधिकारी, तंत्रज्ञ आणि कामगारांनी दाखवलेली तांत्रिक कुशलता आणि शेतकरी सभासदांनी दिलेल्या उत्तम गुणवत्तेच्या उसामुळेच आपण उच्च साखर उताऱ्यासह ही कामगिरी करू शकलो. हा पुरस्कार म्हणजे केवळ एका वैयक्तिक यशाचा टप्पा नसून, संपूर्ण ‘कृष्णा’ परिवाराला मिळालेली पावती आहे. भविष्यातही कारखान्याचे विस्तारीकरण, उपपदार्थ निर्मिती, सौरऊर्जा व सीबीजी बायोगॅस यांसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून कारखान्याला अधिक सक्षम बनवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’
‘- डॉ. सुरेश भोसले (बाबा)
चेअरमन,य.मो. कृष्णा कारखाना






