‘अशोक’च्या सभासदांना प्रतिटन ३,८०० रुपये दर देण्याची ग्वाही

आवडल्यास ही बातमी शेअर करा

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादक सभासदांना प्रतिटन ३,८०० रुपये दर देण्यात येईल. तसेच कामगारांचे अकरा महिन्यांचे थकीत वेतन एका महिन्यात अदा केले जाईल, अशी ग्वाही साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त प्रतापराव भोसले यांनी दिली.

श्रीरामपूर शहरातील शिवबा हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भोसले बोलत होते. अशोक कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ सप्टेंबरला होणार आहे. या सभेत कारखान्याचा कारभार सुकाणू समितीकडे सोपविण्याची मागणी सभासदांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांचा दौरा सुरू असून, कामगारांचे मेळावेही घेतले जात आहेत. कारखान्याच्या दहा हजारांहून अधिक सभासदांनी सर्वसाधारण सभेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही भोसले यांनी केले.

सध्या कारखान्याला प्रतिटन उसामागे सुमारे ७०० रुपये व्याज द्यावे लागत आहे. कारखान्यावर जवळपास ३९० कोटी रुपयांचे कर्ज असून, ऑक्टोबर २०२५ पासून कामगारांचे वेतन थकीत आहे. अशी परिस्थिती असली तरी कारखाना सक्षमपणे चालविण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा दावा भोसले यांनी केला.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाशी संबंधित कामाचा अनुभव असल्याने त्याचा फायदा अशोक कारखान्याला करून दिला जाईल. कारखान्याचे आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहवालातील आकडेवारीवर आक्षेप

कारखान्याच्या वार्षिक अहवालात कामगारांची थकीत देणी ७१ लाख रुपये दाखविण्यात आली आहेत. प्रत्यक्षात कामगारांचे ११ ते १५ कोटी रुपये थकीत असल्याचा दावा भोसले यांनी केला. त्यामुळे अहवालातील माहिती चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, प्रतापराव भोसले हे कारखान्याचे सभासद असून त्यांना आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांच्या वक्तव्यावर अधिक भाष्य करणार नसल्याची प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »