‘नासाका’च्या पुनरुज्जीवनासाठी शेतकरी-कामगारांची कृती समिती

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या (नासाका) पुनरुज्जीवनासाठी शेतकरी आणि कामगारांनी एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना पुन्हा सुरू करणे, शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले आणि कामगारांचे वेतन मिळवून देण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यीय कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या सचिवपदी विष्णू गायखे यांची निवड झाली आहे.
नासाकाशी संबंधित थकीत देणी आणि कारखान्याच्या भवितव्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शेतकरी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून तीव्र लढा उभारण्याची तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, नासाकाच्या थकीत देण्यांबाबत प्रशासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. अष्टलक्ष्मी शुगर कंपनी आणि प्रसाद घाटवे यांनी शेतकरी, कामगार तसेच अन्य संबंधितांची देणी भागविण्यासाठी ठोस आर्थिक आराखडा सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत आराखडा सादर न केल्यास कंपनीसह संबंधित संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेवर महसूल वसुली प्रमाणपत्रांतर्गत (आरआरसी) जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या घडामोडींमुळे नासाका प्रकरणाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि कामगारांची थकीत रक्कम मिळवून देणे, कारखाना सुरू ठेवणे, आगामी गळीत हंगामाबाबत स्पष्ट निर्णय घेणे आणि शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळवून देणे, या प्रमुख मागण्यांसाठी कृती समिती शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे.
साखर आयुक्तांसह संबंधित शासकीय विभागांना निवेदने देऊन नासाका प्रकरणात ठोस निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रश्नावर आंदोलनाची दिशा काय राहणार, याकडे शेतकरी आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.





