ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून कामगाराचे अपहरण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पाच संशयितांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

मुरुड (जि. लातूर) : ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी घेतलेली दहा लाख रुपयांची उचल परत न केल्याच्या कारणावरून कमलेवाडी येथील सचिन लालसिंग पवार यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच संशयितांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन पवार यांनी २०२१ मध्ये कर्नाटकातील बेळगाव येथील ‘जीएम शुगर लिमिटेड एनर्जी’ या कारखान्यासाठी सहा कोयते, म्हणजेच बारा ऊसतोड कामगार पुरविण्याच्या उद्देशाने दहा लाख रुपयांची उचल घेतली होती. मात्र, संबंधित कामगार कारखान्याकडे कामासाठी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे संबंधितांकडून वारंवार पैसे परत देण्याची मागणी केली जात होती. तसेच फोनवरून धमक्याही दिल्या जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी तुळजापूर येथे मजूर आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगून सचिन पवार यांना बोलावण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना एका वाहनात बसवून नेण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात शिवा पाटील, ओम पाटील, रणजित ठाकूर, ज्ञानेश्वर देवकते आणि संगीता वडदार यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सचिन यांचे वडील लालसिंग पवार यांनी २० सप्टेंबर रोजी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जावेद शेख करीत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »