साखरेचा किमान विक्रीदर ५० रुपये करा : राजू शेट्टी

वारणानगर : साखर उद्योगासमोरील वाढत्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे ठोस पाठपुरावा करावा. प्रसंगी साखर कारखानदारांनी एकजुटीने संघर्षाची भूमिका घ्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
राजू शेट्टी यांनी वारणानगर येथे वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. यावेळी साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
चालू गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, हंगाम लवकर सुरू केल्यास उसाचा साखर उतारा घटून शेतकरी आणि कारखानदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्याची मागणी शेट्टी यांनी केली.
साखरेचा किमान विक्रीदर प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करावा. इथेनॉल उत्पादनावरील निर्बंधांमुळे प्रकल्पांच्या कर्जाचे व्याज आणि हप्त्यांचा भार कारखान्यांवर पडत असल्याने वर्षभराची व्याजसवलत देऊन कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
साखर उद्योग स्थिरावण्यासाठी नाबार्ड, एसडीएफ किंवा एनसीडीसीच्या माध्यमातून खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना वार्षिक चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच ऊसतोडणी आणि वाहतुकीचे दर स्वतंत्रपणे निश्चित करावेत, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली.
या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील हंगामापासून शेतकरी आणि कारखानदारांना मोठा आर्थिक फटका बसून साखर उद्योग संकटात येण्याची भीती आहे. सरकारच्या दबावाखाली कोणताही निर्णय न घेता १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू केल्यास शेतकरी आणि कारखानदारांमध्ये संघर्ष अटळ असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, संपर्कप्रमुख अण्णा मगदूम, पन्हाळा तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, सुधीर मगदूम, विजय सावंत आणि अंकुश पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.






