ऊसतोडणी व वाहतूक मजुरीत शंभर टक्के वाढीची मागणी

बीड : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदारांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊसतोडणी आणि वाहतूक मजुरीत शंभर टक्के वाढ करण्यासह विविध मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांचे चाक फिरू देणार नाही, असा इशारा लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेने दिला आहे.
बीडसह लगतच्या जिल्ह्यांमधून दरवर्षी लाखो ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कामासाठी स्थलांतरित होतात. या कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी नव्या दर करारात ऊसतोडणी आणि वाहतूक मजुरीत शंभर टक्के वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
ऊसतोड कामगार संघटना आणि साखर संघ यांच्यातील तीन वर्षांचा दर करार संपुष्टात आल्याने नव्या कराराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगामी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी या प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढावा, अशी संघटनेची भूमिका आहे.
संघटनेच्या वतीने साखर संघाला अकरा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. बैलगाडी, गाडी सेंटर, मिनी ट्रॅक्टर, ट्रक आणि अन्य वाहतुकीच्या दरात शंभर टक्के वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये ७० टक्के वाढ करावी, प्रत्येक ऊसतोड कामगार व मुकादमाचा विमा साखर कारखान्याने बंधनकारक करावा, अशा प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे.
ऊसतोडणी किंवा वाहतुकीच्या कामादरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिडके आणि सचिव गोरक्ष साळवे यांनी या मागण्यांबाबत माहिती दिली. मागण्या मान्य न झाल्यास कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा संघटनेने घेतल्यामुळे आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





