सालगड्याचा प्रताप! उसाच्या फडात पिकवला गांजा

शिरूर अनंतपाळ : निलंगा तालुक्यातील बुज्रुकवाडी शिवारात उसाच्या फडामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतात काम करणाऱ्या एका सालगड्याला पोलिसांनी अटक केली. कारवाईत ४६ किलो ६५७ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत सुमारे ३३ लाख ४३ हजार ७९० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिरूर अनंतपाळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. पोलिसांना बुज्रुकवाडी येथील एका शेतातील उसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने संबंधित शेतावर छापा टाकला.
तपासणीदरम्यान उसाच्या फडात गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून संशयित सालगड्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतमालक नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असल्याने शेतीची जबाबदारी सालगड्याकडे सोपविण्यात आली होती. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने परस्पर गांजाची लागवड केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






