देवगिरी कारखान्याची जमीन विक्री वादात

व्यवहार रद्द करण्यासाठी चौकशी करून कायदेशीर कारवाईचा ठराव
फुलंब्री : देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या चौका येथील ४२ एकर जमीन ७ कोटी ४१ लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचा मुद्दा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. या जमीन विक्री व्यवहारावर आक्षेप घेत, तो रद्द करण्यासाठी चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
कारखाना बँकेच्या ताब्यात असताना मशिनरी चोरीला गेल्याप्रकरणी बँकेविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. सोमवारी झालेल्या २८व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय अध्यक्ष कल्याण चव्हाण होते.
खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास सिरसाट, मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कारखाना २०२६-२७ च्या हंगामासाठी सुरू करण्याकरिता बँकेकडे कर्जाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, कर्ज मिळाल्यानंतर मशिनरी दुरुस्ती करून गाळप सुरू करण्याची माहिती सभेत देण्यात आली.
खासदार काळे यांनी मागील हंगामात गाळप सुरू न झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मशिनरी चोरीप्रकरणी बँकेकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणीही करण्यात आली.






