‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल


- डॉ. राजेंद्र सरकाळे
- मुख्य कार्यकारी (CEO), अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक
हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. १९५५ मध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स्) कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॅकॅर्थी यांनी मांडली व एआय प्रणालीचा जन्म झाला. या कालावधीमध्ये अनेक विविध प्रकारच्या योजनांचा व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व शेतकरी यांना शाश्वत उपजीविकेबद्दल अवगत करण्यात आलं. जगभरातील वाढती अन्न उत्पादनाची मागणी विचारात घेता एआय सारख्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानातून कृषी परिसंस्थेमध्ये जलद बदल होताहेत. या पार्श्वभूमीवर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अॅग्रीस्टॅक तयार करण्याची योजना आखली आहे.
डिजिटल कृषी मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञान, ड्रोन आणि रोबोट्सचा वापर इत्यादी नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांसाठी सरकारने सार्वजनिक आणि खासगी सहभागातून २०२१-२०२५ साठी ही सुरूवात केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता वापरात उत्तर अमेरिका आघाडीवर आहे.
भारत १४ व्या क्रमांकावर
या देशातील शेतकरी लागवड आणि सिंचनापासून ते कीटक व्यवस्थापन आणि पर्यावरणावरील बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी या तंत्राचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरियानेही या क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत जगात १४ व्या क्रमांकावर आहे. आपण कृषी क्षेत्रातील जगातील अग्रेसर उत्पादक असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर करून ५ व्या स्थानापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत.
एआयप्रणाली अंतर्गत इंटरअॅक्टिव्ह व यूजर फ्रेंडली डॅशबोर्डच्या मदतीने शेतकऱ्यांना हिट मॅप, सेटलाईट इमेजेस, क्रॉपिंग पॅटर्न रिकमंडेशन सिस्टीम, इरिगेशन मॅनेजमेंट, न्यूट्रियंट मॅनेजमेंट, पेस्ट अॅड डिसीज मॉनिटरिंग इत्यादी घटकांची माहिती ही स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ऐसिनीक फ्युजन (ज्यामध्ये उपग्रह व ड्रोनच्या माहितीला जमिनीतून सेन्सर मार्फत येणाऱ्या डेटासोबत एकत्र करुन पीक व माती संदर्भात बहुमूल्य अशा गोष्टी समजावून घेतल्या जातात), स्पेस आय (ज्या मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन उपग्रहामार्फत घेतले जाणारे शेतीचे छायाचित्रे हे अधिक स्पष्ट केले जातात.) डोप एम. सी. (तंत्रज्ञान हे सेन्सर व हवामान नियंत्रणकक्षा कडून येणारा डेटा वापरुन तापमान व पावसासंबंधित अचूक भाकीत करण्यासाठी वापरले जाते) अशा अनेक नावीन्यपूर्ण अल्गोरिदमचा उपयोग होणार आहे.
एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होईल, तेव्हा कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती होईल, सर्व शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे. येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान प्रणाली वापराचा असल्यामुळे पारंपरिक शेती समोरील आव्हांनाचा मुकाबला करण्यात शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांना यश मिळणार आहे. ज्याप्रमाणे हरित क्रांतीने अन्नधान्य सुरक्षा दिली, त्याचप्रमाणे कृत्रिम बुध्दिमत्ता देखील या दशकातील क्रांतीच ठरणार आहे. याचा शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला याचा फायदा होणार आहे.
एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वातावरणात होणारे बदल, रोग, किडी, गारपीट, ढगफुटी, हवेतील व जमिनीतील आर्द्रता, तापमान, मृदा स्थिती, पाणी, खते, यांच्या उपलब्धतेवरून उत्पादनावर कसा परिणाम होतो, याची माहिती संकलित करून तज्ञांच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असते. पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण, सिंचन, खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये यांची शिफारस इत्यादी गोष्टी सुलभ बनणार आहेत.
सॅटेलाईट मॅपिंगमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची अचूक माहिती मिळाल्याने पीक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढण्यास मदत होणार आहे. मातीचा सामू, क्षारता, ओलावा, नत्र, स्फुरद, पालाश व हवामानातील माहिती दर्शविणाऱ्या अत्याधुनिक सेंसर प्रणालीचा वापर केल्यामुळे पाणी, खत, किड व रोगांच्या नियोजनामध्ये व वापरामध्ये मदत होणार आहे.
हायपरस्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या मदतीने पीक निरीक्षण केल्यामुळे अचूक प्रमाणात खते व कीटकनाशके यांचे स्पॉट अॅप्लीकेशन करण्यास मदत होणार आहे. खतांच्या योग्य वापरामुळे लीचिंग लॉस कमी होऊन भविष्यात जमिनीची सुपीकता वाढीस मदत होणार आहे. शास्त्रोक्त पध्दतीने होणाऱ्या शेतीमुळे उत्पादन वाढण्यास व उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना उत्पादनाची माहिती व पीक काढणीचा अचूक कालावधी ठरवण्यास देखील या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. नगदी व बागायती पिकांमध्ये ऊस, कापूस, आले, हळद, द्राक्षे डाळिंब इतर फळपिके व फुलशेती, परदेशी भाजीपाला या सर्व पिकांच्या मूल्य साखळी व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणित उपग्रह प्रणालीचा वापर करता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीक उत्पादनामध्ये ३० ते ४० टके अधिक वाढ होईल.
सातारा अग्रेसर
ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा नेहमीच अग्रेसर असतो; परंतु एकरी सरासरी उत्पादकता ४०-४५ टनापर्यंत खाली आल्याने व उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक ताणात सापडला आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी एआय प्रणित तंत्रज्ञानाचा वापर करून आडसाली ऊस उत्पादन वाढ कार्यक्रम अवलंबला आहे व यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात १००० शेतकऱ्यांच्या शेतावर हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरले जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील १०० प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग आपण राबवत आहोत. आडसाली ऊसामध्ये लागवडीपासून या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने खते व सिंचन यामध्ये ४० टक्के पर्यंत बचत व उत्पादनात ३०-३५ टक्के वाढ होताना दिसत आहे. ऊस व कापूस शेतीसाठी एआय प्रणाली शाश्वत ठरणार असून महाराष्ट्र शासन देखील याचा अवलंब करण्याबाबत योजना आखत आहे.
आपल्यासमोरील आव्हाने
कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीतील बहुतांश आव्हाने कमी करू शकते. भारतामध्ये लहान आणि सीमांत शेतकरी सुमारे ८६ टक्के आहेत. ज्यामुळे शेतीचे उत्पन्न शाश्वत नाही. शेतीमध्ये एआयचे बरेच फायदे असूनही अनेक घटकांमुळे शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा पूर्णपणे स्वीकार करता येत नाही, अशा तंत्रज्ञानासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज भासते. मोठ्यांच्या तुलनेत लहान शेतकऱ्यांकडे अनेकदा मर्यादित संसाधने असतात. यामुळे एआय प्रणाली वापरावर मर्यादा येतात. याबाबी विचारात घेता परवडणारे तंत्रज्ञान सक्षम पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणात लक्षणीय गुंतवणूक आवश्यक आहे. या सर्व बाबीशिवाय भारतातील शेती ही पूर्णतः निसर्ग व पत्तपुरवठ्यावर आधारित आहे.