राज्य सहकारी संघाच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी योगदान द्यावे : प्रवीण दरेकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१०८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाहन; प्रशिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनावर भर

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मजबूत करण्यासाठी सहकारी संस्था, बँका आणि सभासदांनी एकत्रितपणे योगदान देणे आवश्यक आहे. संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास सहकार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणाची कामे अधिक प्रभावीपणे करता येतील, असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या १०८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संघाचे उपाध्यक्ष अर्जुन कोतकर, महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजय कुमठेकर, राज्य सहकारी संघाचे मानद सचिव प्रकाश भरे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि सभासद यावेळी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सभासद शुल्कातून संघाचा दैनंदिन खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन भागविणेही कठीण होत आहे. त्यामुळे संघाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा. राज्य सहकारी बँकेने दिलेल्या २५ लाख रुपयांच्या मदतीचाही त्यांनी उल्लेख केला.

प्रशिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य

सहकार क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी सांगितले. प्रशिक्षण केंद्रांमध्ये नियमित अध्यापन, वेळेवर मानधन आणि प्रभावी व्यवस्थापन आवश्यक आहे. केवळ परीक्षा घेण्यापुरते काम मर्यादित न ठेवता प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष ज्ञान मिळेल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षण केंद्रांची पाहणी करून तेथील अडचणी जाणून घेतल्या जातील. कामकाजात सुधारणा करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

शासनाकडे प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा

संघाच्या आर्थिक प्रश्नांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे दरेकर यांनी नमूद केले. विविध मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात आले असून, मुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

सहकारी संस्थांमध्ये आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याबरोबरच सहकाराची तत्त्वे, व्यवस्थापन आणि व्यवहारज्ञानाचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांना सक्षम प्रशिक्षण देणारी व्यवस्था उभी करण्यासाठी संघाला बळकट करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

सभासदांनी केवळ त्रुटी निदर्शनास न आणता त्या दूर करण्यासाठी सहकार्य करावे. संस्था टिकविणे आणि तिची प्रगती साधणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन दरेकर यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »