भोगावती कारखान्याच्या वतीने रोजगार मेळावा

राशिवडे : काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शाहूनगर परिते, ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या मेळाव्याला कोल्हापूरसह कागल, शिरोली, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींतील १६ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन कागदपत्रे घेण्यात आली. निवडीनंतर त्यांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.
प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील होते. पी. एन. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब बुगडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रास्ताविकात बोलताना अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी स्व. पी. एन. पाटील यांनी शेकडो तरुणांना नोकऱ्या दिल्या होत्या. रोजगाराभिमुख समाजनिर्मितीचे त्यांचे स्वप्न होते, ते साकारण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी स्व. पाटील यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी सलग पंधरा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे सांगितले.
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, एच. आर. मॅनेजर विजय पाटील यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले. स्वागत संजय पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी मानले.