थकित ऊस बिल द्या, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

अणदूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील ऊसबील अद्यापही दिले नाही. ऊसबील तात्काळ द्यावे अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा अणदूर येथील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांना निवेदन देऊन दिला आहे. या निवेदनात म्हटले की, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी कारखान्यास गाळपासाठी ऊस कारखान्यास पाठवला आहे. ६ महिन्यांपासून अनेकदा हेलपाटे मारुन व प्रत्यक्ष भेट घेऊन ऊसबील देण्याची कारखाना प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे. परंतु कोणीही दखल घेतली नाही. आमचे ऊसबील तत्काळ देण्याचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांनी द्यावेत. ऊस बील न दिल्यास पुढील गळीत हंगामाचा परवाना कारखान्यास देऊ नये अशी मागणी केली आहे.
या मागणीची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर शेतकरी रामचंद्र आलुरे, सुभान घोडके, मकरंद भालकरे, पवन आलुरे, प्रविण धरणे, केदार आलुरे, सुवर्णा धरणे व खंडू पाटील आदी शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.