कृष्णा कारखाना यशाची परंपरा कायम राखेल -चेअरमन डॉ. सुरेश भोसले

आवडल्यास ही बातमी शेअर करा


कराड । शुगरटुडे
गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारी कठीण टप्प्यातून जात असून, यंदा दुष्काळाचे सावट आणि उसाच्या टंचाईमुळे राज्यभरातील अनेक कारखाने अवघे ६० ते ९० दिवस चालण्याची शक्यता आहे. परंतु, अशा आव्हानात्मक परिस्थितीतही सभासद शेतकरी, कामगार आणि संपूर्ण ‘कृष्णा’ परिवाराला सोबत घेऊन शिस्त व पारदर्शक कारभाराच्या बळावर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना यशाची परंपरा कायम राखेल, असा ठाम विश्वास कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांनी व्यक्त केला. कठीण परिस्थितीत कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले (वहिनीसाहेब) यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कराड पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, जि.प. सदस्य शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, माजी जि.प. सदस्य जितेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजी पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, यावेळी पहिल्यांदाच साखर कारखानदार व शेतकरी संघटना एकाच पद्धतीने विचार करायला लागले आहेत. यंदा कमी पावसामुळे ऊस लागणीच्या वाढीवर परिणाम झाला असून, त्यातच दुष्काळाच्या सावटामुळे उसाच्या वजनात घट होण्याची शक्यता आहे. साखरेचे दर काही दिवस वाढले तरी त्याचा फायदा फार काळ मिळाला नाही. सध्या शेतकरी संघटनांकडून सरकारकडे साखरेची किमान विक्री किंमत प्रति किलो ५० रुपये करण्याची मागणी केली जात आहे. वाढता वाहतूक खर्च, डिझेल आणि पीपी बॅग्जचे वाढलेले दर पाहता साखरेची किमान विक्री किंमत ४५ ते ५० रुपये मिळाल्याशिवाय ही कारखानदारी टिकणे कठीण झाले आहे.

​ते पुढे म्हणाले, यंदा दुष्काळामुळे उसाची वाढ झालेली नाही, तर दुसरीकडे चारा टंचाईमुळे ऊस चाऱ्यासाठी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संकटातून संपूर्ण साखर उद्योगाला सावरण्यासाठी किमान तीन वर्षांचा काळ लागेल. अशा कठीण परिस्थितीतही कृष्णा कारखान्याने कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले.

​यावेळी संचालक लिंबाजी पाटील, दयाराम पाटील, बाबासो शिंदे, सुनील पाटील, संग्राम पाटील, छबन कांबळे, संचालिका सुनीता शेवाळे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार तसेच माजी संचालक ब्रिजराज मोहिते, सर्जेराव पाटील, दिपकराव जाधव, माणिकराव पाटील, संजय पवार, पै. आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबशेटवार यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​प्रारंभी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांचे सत्कार कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांनी केले. संचालक लिंबाजी पाटील यांनी आभार मानले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »