‘भोगावती’त क्रेनवरून पडून परप्रांतीयाचा मृत्यू

भोगावती : शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे पत्रे बदलण्याचे काम करताना क्रेनवरून तोल जाऊन पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. छोटनकुमार ज्ञानदेव सहनी (वय २५) असे त्या तरुणाचे नाव असून, तो बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील मझोलिया तालुक्यातील थलभितीया येथील रहिवाशी आहे. या अपघाताची नोंद सीपीआर पोलिसांत झाली आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपाल्याने कारखान्यात विविध विभागाती कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी पत्रे खराब झालेले आहेत, ते बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. हेच काम हेळेवाडी (ता. राधानगरी) येथील एस. के. पाटील यांना दिले आहे. त्यांच्याकडे छोटनकुमार सहनी हा कामाला होता. गुरुवारी ऊस उतरण्यासाठी ज्या ठिकाणी क्रेन वापरली जाते त्या ठिकाणी पत्र्याचे काम केले जात होते. ते काम करण्यासाठी छोटनकुमार क्रेनवर चढला होता. मात्र, अचानक त्याचा तोल गेल्याने जवळपास ४० फूट खाली कोसळला. त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला.