साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार
NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे ४९ लाख टनांनी (१५.३६ टक्के) उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
NFCSF ने १५ फेब्रुवारी रोजी देशभरातील गाळप आणि साखर उत्पादनाची आकडेवारी जाहीर करताना, या हंगामात एकंदरित किती साखर उत्पादन होईल, याचा अंदाजही जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्रात यावेळी ८६ लाख टन एवढे साखर उत्पादन होईल. मागच्या हंगामात ११०.२० लाख टन साखर उत्पादित झाली होती. म्हणजे यावेळी मोठी घट होण्याचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राने साखर उत्पादनात देशात पहिला क्रमांक राखला आहे. मात्र या हंगामात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर जाईल, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश ९३ लाख टन उत्पादनासह पहिल्या क्रमांकावर राहील. गतवर्षी सुमारे १०३ टनांसह तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
साखर उत्पादनात तिसरे मोठे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये ५३ लाख टनांवरून, यंदा ४१ लाख टनांवर उत्पादन घसरण्याची शक्यता NFCSF ने वर्तवली आहे.
देशाच्या एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये देशाच्या एकूण उत्पादनाच्या ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक साखर उत्पादन करतात. या तिन्ही राज्यांमध्ये यंदा अनुकूल परिस्थिती अभावी साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे.
गेल्या हंगामात देशात ५३३ साखर कारखान्यांनी गाळप घेतले, यंदा ५३१ कारखान्यांनी गाळप घेतले. गेल्या वर्षी आज अखेर ५०५ कारखाने सुरू होते, तर यंदा ४५४ कारखाने सुरू आहेत. एकूण ७७ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. त्यात महाराष्ट्रातील ३० कारखान्यांचा समावेश आहे. गत हंगामात आतापर्यंत केवळ ७ कारखान्यांचा गाळप आटोपले होते.
महाराष्ट्रात १५ अखेर ६८.१० लाख साखर उत्पादन झाले आहे, गतवर्षी ते ७९.४५ लाख टन होते. सरासरी उताऱ्यातही मोठी घट झाल्याचे दिसते. गतवर्षी ९.९० टक्क्यांचा सरासरी उतारा यंदा ९.२० टक्क्यांवर आला आहे. देशाचा सरासरी उतारा ९.०९ टक्के आहे.