मापात पाप; कर्नाटकात २१ साखर कारखान्यांवर छापे

उद्योगमंत्र्यांच्या कारखान्याचाही समावेश
बंगळुरू : काही कारखान्यांकडून उसाचे वजन कमी दाखवले जात आहे, प्रत्यक्षात आम्ही पाठवलेल्या उसाचे वजन अधिक होते, अशा तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केल्याने, कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आणि गुरूवारी राज्यातील 21 साखर कारखान्यांवर छापे टाकले. त्यामुळे कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की आमची पथके छाप्यांदरम्यान गोळा केलेल्या तपशीलांची तपासणी करतील आणि त्या माहितीच्या आधारे कारखान्यांकडून स्पष्टीकरण मागवले जाईल.
राज्य सरकारने पहिल्यांदाच साखर कारखान्यांवर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत. साखर, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे सहा जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. बंगळुरूहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे ऑपरेशन राबवले.
ज्या कारखान्यांवर छापे टाकण्यात आले त्यात, उद्योगमंत्री मुरुगेश आर निराणी यांच्या निराणी शुगर्स लिमिटेडचाही समावेश आहे. वस्त्रोद्योग व साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांच्या निर्देशानुसार ऊस विकास आयुक्त आणि साखर संचालक शिवानंद एच काळकेरी यांच्या नेतृत्वाखाली छापे टाकण्यात आले.
काही साखर कारखाने वजन कमी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना छापे टाकण्याचे निर्देश दिले, असे विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की ते छाप्यांदरम्यान गोळा केलेल्या तपशीलांची तपासणी करतील आणि त्या माहितीच्या आधारे कारखान्यांकडून स्पष्टीकरण मागतील. या अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात कोणत्या घटकांचा सहभाग होता हे सांगणे खूप घाईचे आहे कारण सर्व वस्तुस्थितीची सविस्तर तपासणी केल्यानंतरच हे स्पष्ट होईल.
बेळगावीतील आठ, बागलकोटमधील चार, विजयपुरा येथील चार, बिदरमधील दोन, कलबुर्गी येथील दोन आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर सकाळी ७ वाजल्यापासून छापे टाकण्यास सुरुवात झाली.
कर्नाटक शुगर केन ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार म्हणाले की, फसवणूक झाल्याची तक्रार आल्यानंतर छापे टाकण्यात आले. एखाद्या शेतकऱ्याने 15 टन ऊस पुरवठा केला तर ते 14 टन दाखवून शेतकऱ्याची फसवणूक केली गेली, असा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
गेल्या 23 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या ऊस उत्पादकांनी बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. कुरुबुर शांताकुमार म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी त्यांना दर वाढवण्याचे आश्वासन दिले, परंतु किती वाढ होईल आणि ती कधी लागू केली जाईल हे स्पष्ट केले नाही.