‘सिद्धेश्वर’च्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीने लावली जनतेच्या मनात आग


सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी सोलापूरकरांनी सोमवारी विराट मोर्चा काढला.

आजच्या या मोर्चात सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे आयोजित या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

आजच्या या मोर्चात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षदेखील सहभागी झाले होते. सोलापूरमध्ये विमानतळ नसल्याचा फटका स्थानिक व्यापारी, उद्योजकांना बसत आहे. त्यामुळे विमानतळ लवकर सुरू करावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती.

सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळच्या विमानसेवेला अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाने म्हणणे होते. त्यामुळे विमानतळ सुरू करण्यासाठी कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापुरात आंदोलन झाले होते. या आंदोलनाला आधी उपोषण, त्यानंतर रास्ता रोको आणि आता विराट मोर्चाने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्याला लागूनच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. सुमारे 50 वर्षांपासून हा कारखाना कार्यरत आहे.

भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे कारखान्याच्या चिमणीचा अडसर दूर करुन सोलापूरची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोर्चात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूनेही ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, सभासद, कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटक रस्त्यावर उतरले.

याआधी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलने झाली होती. या महिन्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आले होते. विमानतळाच्या मुद्यावरून सोलापूरमधील वातावरण तंग होत असताना आज सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोरामणी येथे विमानतळ सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीद्वारे होटगी येथील विमानतळाच्या मागणीला पर्याय देण्यात आला.

सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी म्हटले की, मला आणि कारखान्याला विरोध करण्यासाठी काही मंडळींचे षडयंत्र सुरू आहे. आम्ही सर्व काम नियमानेच करत आहोत, मात्र वारंवार कोर्टात धाव घेऊन काही मंडळी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पडद्यामागे असलेल्या व्यक्तींचा खुलासा योग्य वेळी करणार, आम्ही संयमाने काम करत आहोत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »