बनावट साखर निर्यात कोट्याचे प्रकरण उघडकीस, चौकशी सुरू

शुगरटुडे विशेष/SugarToday.in Special
मुंबई : साखर निर्यात कोट्याची बनावट कागदपत्रे सादर करून काही महाठकांनी महाराष्ट्रातील दोन साखर कारखान्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, हे महाठक लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. या महाठकांनी कारखान्यांना फसवण्यासाठी अफलातून युक्ती वापरली. कर्नाटकातील एका साखर कारखान्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत, आम्हाला आमचा साखर निर्यात कोटा हस्तांतरित करायचा आहे, अशी बतावणी या महाभागांनी केली आणि संबंधित साखर कारखान्यांची कागदपत्रे सादर केली.
या महाभागांनी मोठी रक्कम घेतली आणि अखेर कोटा हस्तांतर करण्याचा व्यवहार पूर्ण केला. मात्र ज्याची कागदपत्रे सादर केली होती, त्या कारखान्याने संबंधित कारखान्यांना कळवले की, आम्ही आमच्या वाट्याची साखर मागच्या महिन्यातच निर्यात केली आहे. त्यामुळे सध्या आमचा कोटा शिल्लक नाही.
नंतर संबंधित कारखान्याने कागदपत्रांची तपासणी केली असता, निर्यात कोटा कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर एकच धावपळ उडाली. दिल्लीत वाणिज्य मंत्रालयाशी संपर्क झाला. त्या कारखान्याचा निर्यात कोटा आधीच पूर्ण झाल्यावर तेथे शिक्कामोर्तब झाले.
ऊस तोडणी टोळ्यांच्या मुकादमांनी कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रक़रणी पोलिसात तक्रारी दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच, ही घटना घडली आहे. उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, ‘चतुर’ ठक गजाआड जाणार आणि पै न पै त्यांच्याकडून वसूल होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.