साखरेचा दर गगनाला; मग उसाला दरवाढ कधी?

शेतकरी संघटना आक्रमक: कारखान्यांसमोर नव्या दराचे आव्हान
छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर काही ठिकाणी ६० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर याचा थेट परिणाम होत आहे. साखरेच्या या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
यंदाच्या हंगामात ऊसाला ४ ते ५ हजार रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी अपेक्षा घनसवांगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. साखरेच्या बाजारभावात वाढ होत असताना त्याचा फायदा ऊस उत्पादकांनाही मिळाला हवा, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
कौटुंबिक जीवनावर परिणाम:
रोजच्या जगण्यात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात गेल्या आठ ते दहा दिवसांत झपाट्याने वाढ झाल्याचे व्यापारी बाजारपेठेत दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजारपेठेत दर ६० रुपये प्रति किलो आहे. चहा, नाश्ता तसेच पाहुणचारासाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चावर होत आहे. दरम्यान, साखरेच्या दरात वाढ होत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.
उत्पादन खर्चात वाढ
मजुरी, खते, औषधे, सिंचन आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने ऊस उत्पादकांना अधिक दर मिळणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस दराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. साखरेच्या वाढलेल्या बाजारभावामुळे ऊस उत्पादकांकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांसमोर ऊस खरेदी दर निश्चित करण्याचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक मोबदला मिळावा आणि ऊस शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी राहावी, यासाठी यंदा ऊस दराचा प्रश्न निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
शेतकरी संघटना आक्रमक
ऊसाला ४ ते ५ हजार रुपये प्रतिटन दर मिळावा, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून, आगामी गळीत हंगामात ऊस दराचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





