मराठवाडा-खान्देशातील कारखान्यांच्या साठ्याची तपासणी?

छत्रपती संभाजीनगर : सध्या साखरेच्या दरात भरमसाठ वाढ सुरू आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून व्यापाऱ्यांची झाडाझडती सुरू असतानाच आता साखर आयुक्तालयाने ६ जिल्ह्यातील २६ कारखान्यांच्या साठा तपासणीचे आदेश नुकतेच दिले आहेत. प्रादेशिक सहसंचालकांच्या विशेष पथकांद्वारे मराठवाड्यासह खान्देशमधील ६ जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांची झाडाझडती सुरू केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मागील महिन्यापासून साखरेचे दर ४० रुपयांपासून ते तब्बल ४७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. साखरेच्या या वाढत्या दरामुळे साठेबाजांची टोळी सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच सणासुदीत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन अन्न व पुरवठा विभागामार्फत साखरेचे घाऊक विक्रेते, व्यापारी यांच्या दुकानांसह गोदामांची झाडाझडती सुरू केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे साखर कारखान्यांमधील साठा आणि विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर आयुक्तांनी थेट प्रादेशिक सहसंचालकांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सादर करावा, तसेच दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
कारखान्याने डीलर, एजंट किंवा घाऊक ग्राहकांना साखर विकल्यानंतर, ती ७ दिवसांच्या आत कारखान्याच्या आवारातून उचल करावी. ७ दिवसांपेक्षा जास्त काळ साठा कारखान्यात पडून राहिल्यास कारवाई केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत साखरेच्या साठ्यावर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार कोणत्याही घाऊक व्यापाऱ्यांना ४०० टनांपेक्षा जास्त साखर ३० दिवसांपेक्षा जास्त काळ साठवता येणार नाही.






