दरवाढीचा लाभ ऊस उत्पादकांच्या पदरात पडणार?

बेळगाव : साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत असून, त्याचा थेट फायदा ऊस उत्पादकांना मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, मजुरी, मशागत, वाहतूक आणि सिंचनाचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे साखरेच्या वाढलेल्या दराचा योग्य हिस्सा शेतकऱ्यांच्या उसाच्या दरात प्रतिबिंबित होणे गरजेचे असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
साखरेच्या दरवाढीमुळे कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न
साखरेच्या वाढलेल्या बाजारभावाबरोबरच इथेनॉल, मळी आणि बगॅस यांसारख्या उपउत्पादनांतूनही साखर कारखान्यांना उत्पन्न मिळते. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारल्यास एफआरपीव्यतिरिक्त अतिरिक्त हप्ता किंवा बोनस देणे शक्य होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उत्तर कर्नाटक आणि बेळगाव परिसरातील अनेक कारखान्यांचा साखर उतारा तुलनेने चांगला आहे. त्यामुळे वाढलेल्या साखरेच्या दराचा फायदा महसूल-वाटपाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी पुढे येत आहे.
वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना कधी?
साखरेच्या बाजारभावात वाढ होत असताना त्याच प्रमाणात उसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. उत्पादन खर्च वाढत असताना केवळ मूलभूत एफआरपीवर समाधान न मानता साखर दरवाढीतील अतिरिक्त उत्पन्नाचा काही हिस्सा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी अपेक्षा आहे.
आता साखरेच्या दरवाढीचा फायदा कारखानदार ऊस उत्पादकांच्या पदरात किती टाकतात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. साखरेचा दर वाढला, तर उसाचा दरही वाढणार का? हा प्रश्न सध्या ऊस उत्पादकांसमोर आहे.






