सलग दुसऱ्या वर्षी दोन एकर ऊस आगीत भस्मसात!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

घनसावंगी : तालुक्यातील आवलगाव येथील शेतकरी विठ्ठल नारायण निचळ यांच्या गट क्रमांक ९ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. शेतातील रोहित्रातून शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाने ओढ दिल्याने यंदा शेतकरी आधीच अडचणीत आहेत. उपलब्ध पाण्यावर ऊस जगवण्यासाठी निचळ यांनी पाणी, खते, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च केला होता. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे उभे पीक डोळ्यादेखत जळून गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षीही याच शेतातील ऊस आगीत जळाला होता. सलग दुसऱ्या वर्षी अशी घटना घडल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डीपी स्थलांतराची वारंवार मागणी

शेतातून विद्युत डीपी असल्याने त्यापासून पिकाला धोका निर्माण होत असल्याचे निचळ कुटुंबीयांचे म्हणणे आहे. डीपी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी संबंधित वीज विभाग आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शेतातील रोहित्र तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पंचनामा करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याच्या घटना यापूर्वीही जालना जिल्ह्यात नोंदल्या गेल्या आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »