उंच उसात फवारणीचे आव्हान; ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय

महाकाळ (ता. जालना) : अंबड तालुक्यातील महाकाळ, सुपुरी आणि परिसरातील उसाच्या पिकांवर रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असून खत, औषधे, मशागत, पाणी आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादन खर्चात भर पडली आहे. अशातच रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वाढलेल्या उसात पारंपरिक पद्धतीने फवारणी करणे कठीण ठरत आहे. उंच आणि दाट उसाच्या शेतात मजुरांद्वारे फवारणी करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आधुनिक सिंचन पद्धती आणि यांत्रिकीकरणाचा स्वीकार होत असतानाच ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरही वाढविण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील उसाच्या पिकांची पाहणी करून रोग-किडीवर नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रोगांची लक्षणे ओळखून योग्य औषधांची मात्रा आणि ड्रोनद्वारे फवारणीची पद्धत याबाबत मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.






