साखरेच्या दरात पुन्हा मोठी उसळी!

गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ
पुणे : साखरेचा पुरवठा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने बाजारातील दरवाढ कायम आहे. गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली असून, घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचा दर मंगळवारी क्विंटलमागे ५७०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारातही साखरेचा दर प्रतिकिलो ५९ ते ६० रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशावर भार पडत आहे.
अतिरिक्त साखर कोटा खुला करण्याची मागणी
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मात्र, बाजारातील मागणीच्या तुलनेत हा कोटा अपुरा असल्याने साखरेची दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे अतिरिक्त साखर कोटा खुला करण्याची मागणी व्यापारी आणि साखर उद्योगाकडून जोर धरू लागली आहे.
ऑगस्ट महिन्यातील उर्वरित १३ दिवस, त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने लक्षात घेता नवीन गाळप हंगाम सुरू होण्यास अजून सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी आहे. या काळात बाजारातील साखरेचा पुरवठा कमी पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच सट्टेबाजांची वाढलेली सक्रियता तेजीत भर घालत असल्याची माहिती बाजारातील जाणकारांनी दिली.
व्यापाऱ्यांकडून साखरेच्या निविदांचे दरही क्विंटलमागे ५५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून अतिरिक्त कोटा खुला न केल्यास वाढत्या दरांना लगाम घालणे कठीण होऊ शकते.
दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त दोन लाख टन साखरेचा कोटा खुला करण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कारखान्यांकडे अन्य राज्यांच्या तुलनेत साखरेचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील कारखान्यांना प्रत्येकी एक लाख टनांचा अतिरिक्त कोटा दिल्यास बाजारातील साखरेचा पुरवठा तातडीने वाढू शकतो.
अतिरिक्त कोटा उपलब्ध झाल्यास बाजारातील वाढत्या दरांना काही प्रमाणात आळा बसून दर स्थिरावण्यास मदत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणता निर्णय घेते, याकडे साखर उद्योगासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.





