स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोड यंत्रणा रोखली

उसाला प्रतिटन पाच हजार रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी
धाराशिव : आगामी गळीत हंगामात उसाला प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून रविवारी (ता. ४) कळंब तालुक्यातील वाकडी येथील डीडीएन शुगरची ऊसतोड यंत्रणा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादनात घट आणि वाढता शेतीखर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या परिस्थितीत गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच समाधानकारक पहिली उचल मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. ही मागणी मान्य होईपर्यंत ऊसतोड यंत्रणा सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास काळे यांनी दिला.
“शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मागणी मान्य न झाल्यास धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड यंत्रणा सुरू होऊ देणार नाही,” अशी भूमिकाही संघटनेने स्पष्ट केली. त्यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसदराचा प्रश्न तापण्याची चिन्हे आहेत.






