पणन अधिनियमात सुधारणा करा – भारतीय किसान संघ

अहमदनगर – शेतमाल खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करावी, दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चाललेले मौलिक वाणांचे संवर्धन करावे, बियाण्यांबाबत शेतकऱ्याला स्वावलंबी करून संवर्धनाचा कृती आराखडा तयार करावा, शेतीला किमान १२ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा आदि मागण्या भारतीय किसान संघ प्रदेश बैठकीत करण्यात आल्या.
भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या बैठकीत कृषीविषयक अनेक विषयांवर चिंतन करण्यात आले. महाराष्ट्राचे प्रभारी कैलास धक्कड (राजस्थान), प्रांताध्यक्ष बळिराम सोळुंके, प्रदेश संघटनमंत्री दादा लाड, महामंत्री मदन देशपांडे, नाना जाधव या वेळी उपस्थित होते.
शेतमालाची खरेदी होताना खरेदीदारांकडून फसवणूक होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. जुने पणन कायदे त्याला कारणीभूत असल्याचे दिसत आहे. पणन सुधारणा करणे गरजेचे आहे. देशात व राज्यात अनेक जुने वाण जतन होणे गरजेचे आहे. मात्र ते होत नाहीत. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.