सह्याद्री साखर कारखान्याचे ऐतिहासिक पाऊल

११ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा विस्तार प्रकल्प कार्यान्वित
सातारा : सहकार महर्षी पी. डी. पाटील यांचे स्वप्न आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून आकाराला आलेल्या ‘सह्याद्री’ साखर कारखान्याने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. कारखान्याचा नवीन विस्तारवाढ प्रकल्प सर्व तांत्रिक अडचणींवर मात करून यशस्वीरित्या कार्यान्वित झाला असून, आता कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ११,०००मेट्रिकटनांच्या पुढे गेली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी उपाध्यक्ष कांतिलाल पाटील, संचालक जशराज पाटील, कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांच्यासह कारखान्याचे सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
१९७० मध्ये स्थापन झालेल्या या कारखान्यासाठी संस्थापक (कै.) पी. डी. पाटील यांनी १० हजार टनांचे जे दूरदृष्टीचे उद्दिष्ट ठेवले होते, ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. या विस्तारामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखाना आता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांपैकी एक ठरला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा: गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस तोडणीतील विलंब आणि त्यासंबंधीच्या तक्रारी आता पूर्णपणे थांबणार असून, सभासदांचा संपूर्ण ऊस वेळेत गाळप केला जाईल.
पाणी योजनांचा आधार: कारखान्याचा परिसर शेतीपाण्याने समृद्ध करण्यासाठी कारखान्याने हणबरवाडी-धनगरवाडी योजनेसारख्या प्रकल्पांवर भर दिला आहे. यासाठी शरद पवार आणि जयंत पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पाटील यांनी नमूद केले.






