अवघ्या २७ गुंठ्यांत ८१ टन ऊस, पावणे तीन लाख कमावले!

कराड : तालुक्यातील किवळ येथील प्रगतशील शेतकरी राम धरणे यांनी शेतीमध्ये अशक्य कोटीतील कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या २७ गुंठे जमिनीत ८६०३२ वाणाच्या उसाचे तब्बल ८१ टन उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विक्रमी उत्पादनातून त्यांना २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरला आहे.
यशस्वी नियोजनाची त्रिसूत्री:
१. जमिनीची कसदार मशागत: लागवडीपूर्वी ४ ट्रेलर शेणखत आणि १२ टन मळीचा वापर करून जमिनीचा पोत सुधारला. साडेचार फुटी सरी सोडून बीजप्रक्रिया केलेल्या कांड्यांची लागण केली.
२. अचूक खत व्यवस्थापन: लागवडीनंतर १० व्या दिवसापासून ठराविक अंतराने तीन वेळा आळवणी केली. ९० व्या दिवशी युरिया, डीएपी, पोटॅश, सिलिकॉन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (कॉम्बिकीट) संतुलित डोस देऊन भर लावली.
३. आधुनिक तंत्रज्ञान: संपूर्ण उसाला ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला. तसेच, ११० दिवसांनी उसाचा पाला काढून विरळणी केल्यामुळे उसाची जाडी आणि कांडीची लांबी वाढण्यास मदत झाली
नऊ वर्षांपासून ऊसशेतीच राम धरणे हे पूर्वी द्राक्ष शेती करत होते. मात्र, गेल्या नऊ वर्षांपासून त्यांनी पूर्णपणे ऊसशेतीलाच प्राधान्य दिले आहे. धरणे हे बीएस्सी शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित शेतकरी असून, मसूर येथे कृषी सेवा फर्मही ते यशस्वीपणे चालवतात. कृषी निविष्ठांचे सखोल ज्ञान आणि स्वतःचे अनुभव यांच्या आधारे त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली ऊसशेती करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.
दरम्यान, ऊस लागणीनंतर सुरुवातीचे चार महिने शेतीकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिले. वेळच्या वेळी सर्व कामे केली, खतांचे योग्य नियोजन ठेवले आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर अपेक्षित उत्पादन नक्कीच मिळते. शेतीत सातत्य व नियोजन असेल, तर आर्थिक ‘प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे शेतकरी राम धरणे यांनी सांगितले.





