पाकिस्तानात साखर माफियांवर कडक कारवाई

लाहोर: पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी रविवारी पंजाबच्या प्रांतीय राजधानीत एका उच्चस्तरीय बैठकीत साखर तस्कर, साठेबाज आणि नफेखोरांवर कडक कारवाईचा आदेश दिला.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानसह अन्य काही भागात गैरमार्गाने मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत असल्याचे अलीकडेच निदर्शनास आल्याने पाकिस्तान सरकार सतर्क झाले आहे.
पाकिस्तानात १२० रुपये किलोपर्यंत (स्थानिक चलनातील दर) साखरेचे दर गेले होते. शेजारी अफगाणिस्तानात दोनशेवर दर गेल्याने तस्करी आणि साठेमारी प्रचंड वाढली आहे.
बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधानांनी नफेखोरी तसेच तस्करीच्या घटनांवर नाराजी व्यक्त केली. साठेबाजी, नफेखोरी आणि तस्करीमध्ये गुंतलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आणि त्यांना जबर शिक्षा करावी जेणेकरून दुसरा कोणी असे करण्यास धजावणार नाही, असे आदेश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहाबाज यांनी पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांना प्रांतातील साखरेच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
ते म्हणाले की काळजीवाहू प्रांतिक सरकारने अशी यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे जेणेकरुन तस्करी आणि साठवणूक करणार्यांकडून जप्त केलेली साखर लोकांना प्रमाणित किंमतीत पुरवठा करता येईल.
गेल्या आठवड्यात, शहाबाज यांनी इस्लामाबादमध्येही या विषयावर बैठक घेतली होती आणि त्यानंतर केलेल्या कारवाईमुळे पंजाबमध्ये साखरेची किंमत 92 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत खाली आली होती.
पुढील बैठकीत पंजाबातील (पाकमधील पंजाब) प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना दिले. कामाच्या गतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी निर्माणाधीन लाहोर पूल आणि सीबीडी अंडरपासलाही भेट दिली.