सहकारी साखर कारखान्यांची संख्या दोनशेवरून शंभरवर का – अमित शाह

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इथेनॉल धोरणामुळे ४० हजार कोटींचा शेतकऱ्यांना लाभ

पुणे : ”इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे ४१ हजार ५०० कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले, असून त्यातील सुमारे ४० हजार ६०० कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दिली.
सहकारी साखर कारखान्यांची संख्या दोनशेवरून शंभरवर का आली, असा सवाल त्यांनी केला.

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सहकार महापरिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रताप पवार, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, मुंबई बॅँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते.

मोदी सरकारने इथेनॉलच्या बाबतीत घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा फायदा झाल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. तसेच कार्बन उत्सर्जनात प्रचंड घट झाली. इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट २०२५ पर्यंत दुप्पट करून २० टक्क्यावर नेले जाईल,” असे शाह यांनी सांगितले.

साखर कारखान्यांचा प्राप्तिकर रद्द करण्याच्या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे रखडलेली समस्या दूर झाली आहे, शिवाय हा कर पूर्वलक्ष्यी प्रभावाने रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी या क्षेत्रातील गैरप्रकारांबद्दल आत्मचिंतन केले पाहिजे. सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०२ वरून घटून १०१ झाली आहे, तर खासगी कारखाने २२ वरून ९३ वर पोहोचले आहेत. ही वेळ कशामुळे आली, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे शाह म्हणाले.

अनेक जिल्हा बॅंका आणि नागरी सहकारी बॅंका डबघाईला आल्या आहेत. सहकारी चळवळीपुढे विश्वासार्हता कायम ठेवण्याचे आव्हान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »