ऊसतोड कामगारांच्या बीडला रेशीम शेतीची नवी ओळख!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जिल्ह्यात ४,६०० शेतकरी सक्रिय; विविध योजनांतून मिळते अर्थसहाय्य

बीड : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडची आता रेशीम उत्पादनाचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होत आहे. कमी पावसातही चांगले उत्पादन, कोष विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ आणि सरकारी योजनांचे पाठबळ यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यात २०१४-१५ पासून रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या चार वर्षांपासून बीड जिल्ह्याने रेशीम उत्पादनात महाराष्ट्रातील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. सध्या सुमारे ४,६०० शेतकरी या व्यवसायात सक्रिय आहेत. आगामी काळात आणखी दीड ते दोन हजार शेतकरी रेशीम उद्योगात सहभागी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून रेशीम कोषांचे उत्पादनही लक्षणीयरीत्या वाढले आहे. मराठवाड्यातील एकूण रेशीम उत्पादनात बीडचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत कोषांना चांगला दर मिळत असल्याने बाहेरील व्यापारीही खरेदीसाठी बीडमध्ये येत आहेत.

एक एकरासाठी लाखोंचे अनुदान

रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांतून एका एकरासाठी सुमारे ३.२५ लाख ते ४.५० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. याशिवाय शेड उभारणीसाठीही आर्थिक मदतीची तरतूद आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला सक्षम पर्याय म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जात आहे.

रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. योग्य प्रशिक्षण, बाजारपेठ आणि शासकीय मदत मिळाल्यास बीड जिल्हा रेशीम उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून आणखी विकसित होऊ शकतो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »