साखर उद्योगातील CBG : एक मोठी संधी…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

-उदय जाधव
जेएमडी , सदगुरु श्री श्री साखर कारखाना ली , राजेवाडी , जि सांगली.

भारताचा साखर उद्योग आज एका ऐतिहासिक वळणावर उभा आहे. गेल्या अनेक दशकांत या उद्योगाने अनेक परिवर्तनांची यशस्वी वाटचाल अनुभवली आहे. साखरेपासून मळी, मळीपासून इथेनॉल आणि बगॅसपासून कोजनरेशन या टप्प्यांमधून उद्योगाने स्वतःला सतत बदलत ठेवले. आता या परिवर्तनाचा पुढील टप्पा म्हणजे CBG अर्थात Compressed Biogas आधारित एकात्मिक जैवऊर्जा परिसंस्था होय.

साखर उद्योगाला CBG क्षेत्रात नैसर्गिक ताकद लाभलेली आहे. जगभरातील बायोगॅस प्रकल्पांपुढील सर्वात मोठी समस्या म्हणजे फीडस्टॉकचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक आणि सातत्यपूर्ण उपलब्धता. परंतु साखर कारखान्यांकडे प्रेसमड, स्पेंटवॉश, ऊस कचरा, सेंद्रिय स्लज आणि इतर उपउत्पादने आधीपासून उपलब्ध असतात. याशिवाय शेतकरी नेटवर्क, वाहतूक व्यवस्था, जमीन, ऊर्जा पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळही उपलब्ध असते. त्यामुळे एकात्मिक साखर संकुल हे जगातील सर्वात सक्षम CBG मॉडेल ठरू शकते.

मात्र वास्तव हे आहे की भारतातील CBG परिसंस्था अजून पूर्ण परिपक्व झालेली नाही. विशेषतः स्पेंटवॉश डायजेशन, मल्टी-फीड तंत्रज्ञान, वर्षभर स्थिर मिथेन उत्पादन, सल्फर नियंत्रण आणि डायजेस्टेट व्यवस्थापन या क्षेत्रांत अजून मोठी अनिश्चितता आहे. अनेक तंत्रज्ञान पुरवठादार मोठी आश्वासने देतात; परंतु प्रत्यक्ष प्रकल्प सुरू झाल्यानंतर समस्या उद्भवल्यास त्याची जबाबदारी ऑपरेशन टीम किंवा फीडस्टॉक गुणवत्तेवर ढकलली जाते. “फीडस्टॉक योग्य नाही”, “प्रेसमड बदलला”, “ऑपरेटर प्रशिक्षित नाही” अशी कारणे अनेक कारखान्यांना अनुभवास येतात .

CBG उद्योगातील सर्वात मोठे सत्य म्हणजे बायोगॅस हा केवळ यांत्रिक प्रकल्प नसून तो एक जैविक प्रक्रिया आहे. डायजेस्टर ही जिवंत जैविक परिसंस्था आहे. pH, सल्फर, COD, तापमान, सूक्ष्म पोषकद्रव्ये आणि ऑर्गॅनिक लोड यातील लहान बदलसुद्धा गॅस उत्पादनावर मोठा परिणाम करू शकतात. विशेषतः स्पेंटवॉश हा अत्यंत गुंतागुंतीचा फीडस्टॉक मानला जातो.

आज उद्योगातील मोठी चूक म्हणजे पायलट प्लांटला औद्योगिक सिद्धता समजले जाते. एखादा 5 TPD प्रकल्प चालला म्हणजे 100 KLPD डिस्टिलरीशी संलग्न मोठा प्रकल्प दीर्घकाळ स्थिर चालेलच असे नाही. भारताला आता “Commercially Proven” या संकल्पनेची स्पष्ट व्याख्या आवश्यक आहे. तंत्रज्ञान तेव्हाच सिद्ध मानले जावे जेव्हा ते अनेक हंगाम सातत्याने औद्योगिक परिस्थितीत चाललेले असेल आणि त्याचे मिथेन उत्पादन स्वतंत्रपणे प्रमाणित झालेले असेल.

साखर उद्योगातील आणखी एक मोठे आव्हान म्हणजे सिझनल फीडस्टॉक. ऑफ-सीझन काळात डायजेस्टर निष्क्रिय होणे, सूक्ष्मजीव संतुलन बिघडणे आणि ROI कमी होणे या समस्या उद्भवतात. प्रेसमड स्टोरेज, सायलेज, ऊस कचरा ( cane trash )आणि नेपियर गवत यांसारखे पर्याय सुचवले जातात; परंतु भारतीय परिस्थितीत या प्रणाली दीर्घकालीन आणि आर्थिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे.

सल्फर आणि CO₂ व्यवस्थापन हीदेखील अत्यंत गंभीर पण दुर्लक्षित क्षेत्रे आहेत. योग्य व्यवस्थापन नसल्यास गंज वाढतो, मेम्ब्रेनचे आयुष्य कमी होते, OPEX वाढतो आणि गॅस गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे CBG प्रकल्प म्हणजे केवळ डायजेस्टर आणि बॉटलिंग यंत्रणा नसून तो एक एकात्मिक पर्यावरणीय व्यवस्थापन प्रकल्प आहे.

आजची आर्थिक परिस्थिती पाहता साखर उद्योग सतत प्रयोग परवडणाऱ्या स्थितीत नाही. उच्च व्याजदर, FRP दबाव, MSP स्थिरता आणि कर्जबाजारीपणा या अडचणींमुळे उद्योगाला प्रत्येक गुंतवणूक अत्यंत काळजीपूर्वक करावी लागत आहे. सततचे ट्रायल्स आणि अपूर्ण तंत्रज्ञान उद्योगाचा आत्मविश्वास खालावू शकतात.

यामुळे तंत्रज्ञान पुरवठादारांनी आपली मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. भविष्यात यशस्वी तेच ठरतील जे “Total Biological Accountability” स्वीकारतील. फीडस्टॉक अभ्यास, स्टोरेज, मायक्रोबियल स्थिरता, SOP, ऑपरेटर प्रशिक्षण, गॅस हमी, डायजेस्टेट व्यवस्थापन आणि सल्फर नियंत्रण या सर्व बाबींमध्ये एकत्रित जबाबदारी स्वीकारणारे तंत्रज्ञान भागीदारच उद्योगाचा विश्वास जिंकू शकतील.

धोरणकर्त्यांनीही आता केवळ प्रकल्प स्थापनेऐवजी कार्यक्षमतेवर आधारित प्रोत्साहन द्यायला हवे. स्वतंत्र कार्यक्षमता ऑडिट, मिथेन यिल्ड प्रमाणन, मानकीकृत SOP, अपटाईम निकष आणि राष्ट्रीय दर्जाचे फीडस्टॉक प्रोटोकॉल यांची गरज निर्माण झाली आहे.

भविष्यातील दिशा ही स्वतंत्र CBG प्रकल्पांची नसून Integrated Sugar Bioenergy Complexes ची आहे. इथेनॉल, CBG, CO₂ Recovery, Organic Fertilizer, Green Power, Biochar आणि Carbon Credits या सर्व गोष्टी एकात्मिक स्वरूपात चालवल्या गेल्यासच दीर्घकालीन आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्वतता साध्य होऊ शकते.

भारताच्या साखर उद्योगासमोर जैवऊर्जेतील जगातील सर्वात मोठ्या संधींपैकी एक संधी उभी आहे. परंतु ही संधी गमावली जाऊ शकते, जर तंत्रज्ञान पुरवठादारांनी ओव्हरमार्केटींग न करता संपूर्ण परिसंस्था फिडस्टॉक ते गँस चे उत्तरदायित्त्व घेतले नाही ( overprmises and non accountability on upside and downside responsibility ). कारखान्यांनी पुरेशी तयारी न करता गुंतवणूक केली आणि धोरणांनी केवळ स्थापनेला प्रोत्साहन दिले.
उद्योगाला आता आणखी सादरीकरणे किंवा पायलट्सची गरज नाही; तर वैज्ञानिक शिस्त, जैविक समज, प्रामाणिकपणा आणि पूर्ण जबाबदारीची गरज आहे.

पुढील दशक ठरवेल की CBG हा इथेनॉलसारखा यशस्वी परिवर्तनाचा मार्ग बनेल की अपूर्ण प्रयोगांमुळे हरवलेली आणखी एक मोठी संधी ठरेल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »