ऊसशेतीत डिजिटल क्रांती; एआयचा वाढता वापर!

पुणे : बदलत्या हवामानाचा ऊस उत्पादनावर होत असलेला परिणाम, पाण्याची टंचाई आणि खर्चात वाढ या पार्श्वभूमीवर ऊसशेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. योग्य व्यवस्थापन, खतांचा समतोल वापर आणि पाण्याचे नियोजन यामुळे उत्पादनात वाढ साधता येऊ शकते, असे मत आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने निरगुडसर येथील मोरया मंगल कार्यालयात ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर व विकास या विषयायावर आधारित मेळाव्यात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी एआयच्या माध्यमातून शेती अधिक कार्यक्षम कशी होऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले. पारंपरिक पद्धतींमुळे पाणी, खत आणि इतर संसाधनांचा अपव्यय होतो. मात्र, एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जमिनीची सुपीकता, पिकांची गरज आणि हवामानानुसार अचूक नियोजन करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.या तंत्रज्ञानामुळे पिकांना आवश्यक तेवढेच पाणी व खत दिले जाऊन उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात वाढ होते.
या प्रसंगी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस विकास शास्त्रज्ञ अशोक कडलक म्हणाले की, हवामानातील सातत्याने होणारे बदल, वाढता उत्पादन खर्च, पाण्याची उपलब्धता आणि शाश्वत शेतीची वाढती गरज लक्षात घेता ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आता काळाची गरज बनली आहे. मृदा व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ही ऊस उत्पादनवाढीची त्रिसूत्री असून, या तिन्ही बाबींचे अचूक आणि शास्त्रीय नियोजन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करणे शक्य आहे. ऊस पिकाला अधिक पाणी किंवा अधिक खत देणे हा उपाय नसून, पिकाच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात निविष्ठांचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अभिनंदन पाटील, आकाश वळकुंदे, परिमल गिरी, विजय आंग्रे, सुरेश मगडुम तसेच प्रगतिशील महिला शेतकरी मनीषा निघोट यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अशोक भोर यांनी केले, सुरेश टाव्हरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादनक्षमता वाढविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.






