थोरात कारखान्याचा ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा संकल्प

संगमनेर : पारदर्शक कारभार आणि गुणवत्तेमुळे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर सभासद, शेतकरी तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास आहे. आगामी गळीत हंगामात कमी दिवसांत अधिकाधिक ऊस गाळप करून ११ लाख मेट्रिक टनांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. थोरात म्हणाले की, सुमारे २०० किलोमीटर अंतरावरून ऊस आणूनही कारखान्याने उत्पादकांना चांगला भाव दिला आहे. कार्यक्षेत्रात किमान नऊ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होणे आवश्यक आहे. यंदाचा हंगाम कमी कालावधीचा आणि आव्हानात्मक असल्याने दररोज सुमारे नऊ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने नियोजन व तयारी करावी लागणार आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांनुसार कारखान्याची वाटचाल यशस्वीपणे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, कारखान्याचे व्यवस्थापन आदर्शवत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली असली, तरी उपलब्ध सुमारे २० टीएमसी पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात श्री व सौ. शोभाताई-दिलीप नागरे, श्री व सौ. दीपाली-योगेश भालेराव, श्री व सौ. अरुण-विजय रहाणे, श्री व सौ. कमलताई-मदन आंग्रे तसेच श्री व सौ. संतोष बंडनाना भावड यांच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, संचालक, सभासद, कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी आभार मानले.




