ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी २४ ऑक्टोबरला परिषद

ऊसाला प्रतिटन ७,१०० रुपये आधारभूत दर द्या; किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी
कुंडल : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित प्रतिटन ७,१०० रुपये किसान आधारभूत दर कायद्याने निश्चित करून द्यावा, तसेच ऊस मोजणीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे ऑनलाइन करावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांना दिले.
शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. वैभव पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते नंदकुमार हातकीर, कॉ. शहाजी पाटील आणि कॉ. दिनेश कदम यांचा समावेश होता.
ऊस उत्पादनासाठी मजुरी, खते, औषधे, सिंचन, वाहतूक आणि इतर खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य दर मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंडल येथे राज्यव्यापी ऊस परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही शिष्टमंडळाने दिली.
ऊस वजनकाटे ऑनलाइन केल्यास वजन प्रक्रियेत पारदर्शकता येईल. प्रत्येक साखर कारखान्यात एका शासकीय अधिकाऱ्यासह किमान एक शेतकरी प्रतिनिधी नियुक्त करावा, अशीही मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला.




