ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका

युवा शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
माजलगाव : आगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी शेतकऱ्यांना मिळणारा ऊसदर स्पष्टपणे जाहीर करावा. योग्य दर निश्चित झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला.
माजलगाव येथील सुंदरसागर हॉटेलमध्ये समितीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत आगामी गाळप हंगामातील ऊसदर, एफआरपीनुसार मिळणारा भाव, मागील हंगामातील थकीत ऊसबिले आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी करावयाच्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कारखाने सुरू करण्यापूर्वी ऊसदराची अधिकृत घोषणा करावी, अशी भूमिका समितीने मांडली. आगामी काळात विविध भागांमध्ये बैठका घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल.
शेतकऱ्यांना हक्काचा दर मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. ऊस उत्पादकांच्या हितासाठी समिती आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




