‘पीडीसीसी’ बँकेला राष्ट्रीय स्तरावर ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार जाहीर

पुणे : शुगरटुडे
शेतकऱ्यांना दिलेला भक्कम आर्थिक आधार आणि राज्यातील साखर उद्योगाला दिलेल्या मोलाच्या सहकार्याची दखल घेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कारासाठी ‘पीडीसीसी’ बँकेची निवड करण्यात आली आहे.
कृषी आणि साखर उद्योगातील योगदानाची दखल
बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने कृषी क्षेत्रासाठी केलेला भरीव वित्तपुरवठा, ऊस विकासासाठी आखलेल्या योजना, शेतकरी सहाय्य उपक्रम आणि सहकारी साखर कारखानदारीला दिलेल्या निरंतर आर्थिक पाठबळामुळे ही निवड झाली आहे.
२२ सप्टेंबरला नवी दिल्लीत पुरस्कार सोहळा
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे २१ व २२ सप्टेंबर दरम्यान ‘न्यू को-ऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह’ आणि तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता पीडीसीसी बँकेला हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.
या राष्ट्रीय परिषदेस केंद्रीय व राज्य मंत्री, साखर उद्योगातील प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कॉन्क्लेव्हमध्ये साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधींवर सखोल चर्चा होणार आहे.






