होटगीत शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील होटगी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी आमसिद्ध कोरे यांचा चार एकर ऊस जळून खाक झाला. मोठ्या कष्टाने जोपासलेले पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
होटगी येथील गट क्रमांक ४४४ मध्ये कोरे यांनी २६५ वाणाच्या उसाची लागवड केली होती. शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून उसाने अचानक पेट घेतला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग वेगाने पसरली. परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; मात्र चार एकरांतील ऊस वाचवता आला नाही.
या परिसरात वारंवार शॉर्टसर्किटच्या घटना घडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वीही कोरे यांचा ऊस अशाच घटनेत जळाला होता. त्यामुळे महावितरणने परिसरातील तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी कोरे यांनी केली आहे.
यंदा पर्जन्यमान अत्यल्प असतानाही कोरे यांनी मोठ्या कष्टाने ऊस जोपासला होता. मात्र आगीमुळे संपूर्ण पीक नष्ट झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनी शेताची पाहणी करून पंचनामा केला. त्याचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविण्यात आला असून, कृषी विभागालाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कोरे यांनी केली आहे.






