कोपरगावात निकृष्ट गूळ-तुपाविरोधात ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’

अन्न व औषध प्रशासनाची दोन ठिकाणी कारवाई; नमुने प्रयोगशाळेत पाठवणार
कोपरगाव : अन्न व औषध प्रशासन विभागाने नगरपरिषदेच्या पथकासह राबविलेल्या ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६’ मोहिमेत कोपरगाव तालुक्यातील दोन आस्थापनांवर कारवाई केली. या कारवाईत २,१४८ किलो गूळ आणि २४८.४ किलो तुपाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.
शुक्रवारी (दि. १८) कोपरगाव शहरातील एका आस्थापनेची तपासणी करण्यात आली. तेथे सुमारे २,१४८ किलो गुळाचा साठा आढळून आला. त्याची किंमत सुमारे १ लाख १८ हजार रुपये आहे. गुळाच्या दर्जाबाबत संशय आल्याने नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आणि उर्वरित साठा जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई पोहेगाव येथील दूध शीतकरण केंद्रावर करण्यात आली. येथे दोन प्रकारचे एकूण २४८.४ किलो तूप आढळले. या साठ्याची किंमत सुमारे २ लाख ११ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुपाच्या गुणवत्तेबाबत संशय असल्याने त्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त गूळ आणि तुपाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई केली जाणार आहे.






