नदीकाठावर गाळ सोडला; साखर कारखान्यावर गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरातील अवसरी येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (ईटीपी) गाळ परवानगीशिवाय बाहेर सोडून परिसर प्रदूषित केल्याप्रकरणी कारखान्याचे ठेकेदार व एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, २०२५-२६ चा गळीत हंगाम संपल्यानंतर ईटीपीमधील अनट्रीटेड व ट्रीटेड गाळ कंपोस्ट यार्डात टाकण्याचे काम ठेकेदार दीपक करंडे (रा. काठापुर, ता. आंबेगाव) यांना देण्यात आले होते. नियमानुसार गाळ बंदिस्त जागेत ठेवणे अपेक्षित असताना, ३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास संबंधित ठेकेदाराने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने गाळ बाहेर सोडल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे गाळमिश्रित पाणी नदीकाठाकडे वाहत जाऊन परिसर प्रदूषित झाल्याचे निदर्शनास आले आहे. कारखाना प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »