हुमणीच्या प्रादुर्भावाने ऊस उत्पादक संकटात!
पलूस तालुक्यात उसाची वाढ खुंटली
पलूस : तालुक्यातील ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या किडीमुळे उसाची वाढ खुंटत असून पीक पिवळे पडू लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. भाद्रपदातील कडक ऊन आणि उष्ण वातावरण हुमणीच्या वाढीस पोषक ठरत असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे.
हुमणीच्या अळ्या जमिनीत राहून उसाच्या मुळांवर उपजीविका करतात. त्यामुळे मुळांची वाढ थांबते, ऊस पिवळा पडतो आणि पिकाच्या एकूण वाढीवर विपरीत परिणाम होतो. काही भागांत प्रादुर्भाव अधिक असल्याने ऊस वाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात हुमणीच्या नियंत्रणासाठी लागणाऱ्या औषधांचा अतिरिक्त खर्च जोडला जात आहे. शेतकरी महागडी कीटकनाशके वापरत असले, तरी अपेक्षित परिणाम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अळ्या जमिनीच्या आत राहत असल्याने केवळ फवारणी करून त्यांचे प्रभावी नियंत्रण करणे कठीण ठरत आहे.
हुमणीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर, जैविक कीटकनाशकांचा योग्य पद्धतीने उपयोग, जमिनीची व्यवस्थित मशागत आणि प्रादुर्भावाच्या सुरुवातीलाच उपाययोजना करणे आवश्यक आहे. मेटारायझियम अनिसोप्ली या जैविक घटकाचा शिफारशीनुसार वापर केल्यासही नियंत्रणास मदत होऊ शकते.
कृषी विभागाने गावोगावी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि हुमणी नियंत्रणाच्या प्रभावी उपायांची माहिती द्यावी, अशी मागणी परिसरातील ऊस उत्पादकांकडून होत आहे.
आष्टगाव रंजे परिसरात उसावर तांबेरासदृश रोगाचा प्रादुर्भाव
आष्टगाव रंजे : तासगाव तालुक्यातील आष्टगाव रंजे परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, जूनपासून पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उसाची वाढ आधीच खुंटली आहे. त्यातच आता पिकावर तांबेरासदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
परिसरातील दिलीप चव्हाण, गोविंद चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर ऊस लागवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उसाच्या पानांवर लालसर ठिपके दिसू लागले आहेत. रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पाने वाळत असून, पिकाच्या वाढीवरही विपरीत परिणाम होत आहे.
रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषधांची फवारणी केली जात आहे. मात्र, पिकाची वाढ आधीच कमी झाल्यामुळे यंदा ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृषी विभागाने या रोगाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.





