शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास कारखाना कटिबद्ध : थोरात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर : शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. वाघापूर (ता. संगमनेर) येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून ऊस विशेषज्ञ सुरेश माने हे होते, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष पांडुरंग घुले, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे आदींसह विविध पदाधिकारी यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना थोरात म्हणाले की,  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर कारखाना व सहकारी संस्था सुरू आहेत. अत्यंत काळजीपूर्वक व काटकसरीने कारखान्याचे कामकाज सुरू असून आहे. सर्व शेतकऱ्यांनी जूनमध्ये ऊस लागवड केली तर तोडणीसाठी अडचणी तयार होतात म्हणून टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन करणे, याचबरोबर कमी पाणी, कमी श्रम आणि जास्त म्हणजे एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन गरजेचे आहे. शेतीमध्ये अनेक दिवसाचे सातत्याने उत्पादन होत असल्याने आता सेंद्रिय द्रव्यांची कमतरता त्यामध्ये निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी कारखान्याच्या कृषी विभागाच्या मदतीने आपल्याला सेंद्रिय द्रवांचा वापर करावा लागेल.

सुरेश माने म्हणाले, शेतीमध्ये जास्त पाण्यापेक्षा पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. याकरिता ठिबक सिंचनचा सर्वाधिक वापर करा. मे आणि जून महिन्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो यासाठी असणाऱ्या विविध पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. उसाचे वाण, लागवड पद्धत, खते, फवारणी याबाबत शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »