इतर कारखान्यास ऊस दिल्यास सवलती बंद करणार : जगताप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बारामती :  ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास दिल्यास साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत. हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरिता प्राधान्य देण्यात आल्याने सभासदांनी शेतात किमान साडेचार फूट अंतर ठेवून ऊस लागवड करावी. कारखाना यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे. हार्वेस्टरमार्फत ऊस तोडणी झाल्यास प्रतिटन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. दरम्यान, सभासदांनी त्यांच्या एकूण ऊस लागण क्षेत्रापैकी आडसाली ४० टक्के, पूर्व हंगामी १५ टक्के, सुरू १० टक्के आणि खोडवा ३५ टक्के या प्रमाणात ऊस लावण्याचे नियोजन करावे, असे आवाहनही कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमेश्वर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

दरम्यान, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने लागण हंगाम सन २०२५ २६साठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागण धोरण जाहीर केले आहे. आडसाली हंगामासाठी को-८६०३२, व्हीएसआय ९८०५ कोएम ०२६५ या ऊसजातींसाठी १ जुलै १४ ऑगस्टदरम्यान परवानगी देण्यात आली आहे. पूर्वहंगामी ऊस लागणीकरिता को-८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५, व्हीएसआय १०००१, फुले १५०१२, फुले १३००७, व्हीएसआय ०८००५ या ऊस जातींसाठी १ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान परवानगी दिली आहे. एमएस १०००१, को ८६०३२, व्हीएसआय ०८००५, व्हीएसआय ९८०५, फुले १५०१२, फुले १३००७, कोएम ०२६५ या ऊसजातीसाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान सुरू लागवडीसाठी परवानगी देण्यात आली आहे. हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या सर्व जार्तीच्या खोडवा उसाच्या नोंदी नोंदी घेण्यात येणार आहेत. रोप लागणीस प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत लागण नोंदी जास्त आल्यास त्याचा ड्रॉ काढण्यात येणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »