थकित ऊस बिल मागणाऱ्या शेतकऱ्यास चेअरमनची काठीने मारहाण

सचिन घायाळ यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : थकित ऊस बिल मागितल्याच्या कारणावरून आपणास काठीने मारहाण केल्याची तक्रार एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने चेअरमन सीए सचिन घायाळ यांच्याविरुद्ध केली आहे. त्यामुळे घायाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे..
घायाळ हे सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख असून, त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना करारावर चालविण्यास घेतला आहे. पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार घायाळ यांच्यासह तीन जणांविरुद्ध पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नुकतीच पैठणमध्ये घडली.
प्राथमिक माहितीनुसार, शेतकरी राहुल कांबळे (रा. कांचनवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी सचिन घायाळ यांच्या पन्नालालनगर येथील चालवीत असलेल्या एकनाथ सहकारी साखर कारखान्यात चालू हंगामात कारखान्यात ऊस दिला होता.
थकित ऊस बिल घेण्यासाठी कांबळे हे घायाळ यांच्याकडे गेले असता ‘पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर’ असे म्हणून डोक्यात लाकडी काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. याबाबत पीडित शेतकरी कांबळे यांनी पैठण पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर सचिन घायाळ, अमोल घायाळ, सुनील घायाळ, रवींद्र धोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार ठोकळ हे करीत आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात तणाव निर्माण झाला होता, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. कोणतीही बाजू न धरता तपास हा निष्पक्ष करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पैठण पोलिसांनी दिले आहे. या घटनेमुळे सामान्य शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी त्यांना अशाप्रकारे स्थानिक नेत्याकडून होणारी मारहाण होत असल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.