मराठवाड्यातील उस उत्पादकांना दिलासा द्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पाणीपट्टी माफीची आ. प्रवीण स्वामी यांची विधानसभेत मागणी

धाराशिव : मराठवाड्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचा अन्यायकारक बोजा पडत असल्याने ही थकबाकी माफ करून दंड व व्याजही पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत मांडली आहे.

मराठवाडा सध्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. अपुऱ्या पावसामुळे व पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे येथील शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाणीपट्टीची वसुली करणे अन्यायकारक ठरत असल्याचे स्वामी यांनी नमूद केले.

सध्या पाणीपट्टीचे दर रब्बी हंगामासाठी सुमारे ३,७५० रुपये तर उन्हाळी हंगामासाठी ५,६५० रुपये प्रति हेक्टर इतके आहेत. वेळेत भरणा न केल्यास त्यावर दंड व १२ टक्के व्याज आकारले जाते, ज्यामुळे हा दर २२,५०० रुपयांपर्यंत वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होत आहे.

मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देय असलेली मोठी रक्कम अद्याप अदा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपट्टीची थकबाकी माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यासाठी स्वतंत्र व सुलभ सिंचन धोरण लागू करावे, जेणेकरून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही स्वामी यांनी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »