माळेगाव कारखान्याचा ७० वा गाळप हंगाम सुरू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

यंदाही चांगला ऊस दर देणार : सुनेत्रा पवार

पुणे । शुगरटुडे वृत्त

माळेगाव, ता. बारामती येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि साखर उद्योगासाठी हा नव्या आशांचा क्षण आहे.

यावेळी सुनेत्राताई म्हणाल्या की, आदरणीय अजितदादांनी सहकाराला शेतकऱ्यांच्या उन्नतीचे माध्यम मानून माळेगाव कारखान्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. दादांनंतर चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी निर्माण केलेला विश्वास, विचार आणि सहकाराची परंपरा जपत सभासदांच्या हितासाठी कारखाना अधिक सक्षम करण्याचा संकल्प केला आहे.

यंदा कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक ऊसदर देण्यात आला. भविष्यातही चांगला दर मिळावा, यासाठी आर्थिक शिस्त, उत्पादन खर्चावर नियंत्रण, उपपदार्थांमधून उत्पन्नवाढ आणि सीबीजी प्रकल्पावर भर राहील. ऊसतोडणी-वाहतुकीचे नियोजन, सभासदांचे नुकसान टाळणे, ठिबक सिंचन, पाण्याचा काटकसरीने वापर, जमिनीतील ओलावा टिकवणे, कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन, सुधारित ऊस जाती, योग्य खत व्यवस्थापन, शास्त्रीय लागवड आणि आधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादनवाढीस प्राधान्य दिले जाईल. कारखान्याची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवणे, साखरेवरील अवलंबित्व कमी करणे आणि तरुण पिढीला आधुनिक शेती व तंत्रज्ञानाशी जोडून कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावरही भर राहील, असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळसदृश परिस्थिती आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर मात करून गळीत हंगामाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शेतकरी, कामगार व व्यवस्थापनाचा समन्वय, काटेकोर नियोजन आणि सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

यावेळी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, धो. आ. सातव कारभारी फाउंडेशन, महालक्ष्मी उद्योग समूह, I.I.F.L. आणि I Care फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याला मिळालेल्या रोड स्वीपिंग मशीनचे पूजन करून ती प्रशासनाकडे सुपूर्द केली. परिसराच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी ती उपयुक्त ठरेल. त्यानंतर कारखाना परिसराची पाहणी करून विविध बाबींची माहिती घेतली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »