करपलेली पिके, आटलेल्या विहिरी; पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा!

गेवराई : पावसाअभावी वाळलेला ऊस, करपलेली पिके आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर आपल्या व्यथा मांडल्या. गेवराई आणि बीड तालुक्यांतील पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पिकांची परिस्थिती दाखवत तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
गेवराई येथील शेतकरी रामभाऊ मोटे यांनी ऊस आणि कपाशीच्या पिकांची पाहणी करताना पथकाला नुकसानीची माहिती दिली. गेल्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने विहिरीतील पाणी आटल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठीही टँकर मागविण्याची वेळ आली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिले.
ऊस विकून आर्थिक आधार मिळेल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाण्याअभावी ऊस वाळल्याने ती आशाही संपल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वाळलेला ऊस दाखवत मोटे यांनी आता तो जाळून टाकण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची उद्विग्न भावना मांडली.
पथकाने प्रत्येक ठिकाणी शेतात जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. कापूस, सोयाबीन, मका, ऊस आणि फळबागांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने वाढ खुंटली, तर काही पिकांना फुले आणि फळधारणाही झाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पिकांच्या नुकसानीबरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता याबाबतही पथकाने माहिती घेतली. पाहणीवेळी महसूल, कृषी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आता शासनाकडून कोणती मदत जाहीर होते, याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






