‘शुगरटुडे’च्या सल्लागार मंडळावर प्रसिद्ध उद्योजक एस. बी. भड

पुणे । शुगरटुडे वृत्त
प्रसिद्ध उद्योजक श्री. एस. बी. भड यांची साखर व पूरक उद्योग, तसेच सहकार क्षेत्रासाठी समर्पित ‘शुगरटुडे’च्या सल्लागार मंडळावर निवड करण्यात आली आहे. ‘शुगरटुडे’ हे गेल्या पाच वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध हाेणारे आणि या क्षेत्राला समर्पित असे एकमेव मराठी प्रकाशन आहे.
सध्या या सल्लागार मंडळामध्ये ख्यातनाम कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक (प्रमुख मार्गदर्शक), श्री. शेखर गायकवाड (माजी साखर आयुक्त), डॉ. याेगेंद्र नेरकर (माजी कुलगुरू), डॉ. सुरेश पवार (प्रसिद्ध ऊसतज्ज्ञ) आणि डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (प्रसिद्ध ऊसतज्ज्ञ) या अनुभवी नामवंतांचा समावेश आहे.
श्री. एस. बी. भड यांनी या सल्लागार मंडळामध्ये यावे, असे विनंती करणारे पत्र ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक श्री. नंदकुमार सुतार यांनी नुकतेच दिले आणि श्री. भड यांनी लागतीच त्यास होकार दिला. त्याबद्दल श्री. सुतार यांनी श्री. भड यांचे आभार व्यक्त केले. श्री. भड यांच्यामुळे ‘शुगरटुडे’चे सल्लागार मंडळ अधिक अनुभव समृद्ध होणार आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
श्री. भड हे साखर अभियांत्रिकी उद्योग क्षेत्रातील नामवंत कंपनी एस. एस. इंजिनिअर्सचे संस्थापक असून, त्यांनी भारतामध्ये ४६ वर साखर कारखाने उभा केले आहेत. त्यांचे कार्य आणि या क्षेत्रातील अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. त्यांनी नुकतेच पंजाबामध्ये दोन साखर कारखाने उभे केले आहेत. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. (इंडिया) अर्थात डीएसटीए या नामवंत संस्थेचे ते माजी अध्यक्ष असून, त्यांनी या संस्थेला यशाच्या नव्या उंचीवर नेले.
श्री. सुतार हे गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारितेमध्ये आहेत. ‘शुगरटुडे’चा प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी ‘दै. सकाळ’ आणि ‘दै. पुढारी’ यांसारख्या वृत्तपत्रांच्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी दै. लोकमत, दै. एकमत इ. वृत्तपत्रांमध्येही विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते श्री. शरदचंद्र पवार यांच्यासह प्रमुख राजकीय नेते, उद्योजक आदींच्या मुलाखती घेतल्या आहेत.






